पुणे ता १४ : पिंपरी-चिंचवड मध्ये गुन्हेगाराला पोलिस ठाण्यातील गोपनीय माहिती पुरविणाऱ्या गुन्हे शाखेतील पोलिसाला पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे. या कारवाईमुळे पिंपरी चिंचवड पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, अवैध धंदे व गुन्हेगारांविरुद्ध आयुक्त कृष्णप्रकाश यांनी मोहीम उघडलेली असताना पोलिसच गुन्हेगाराला मदत करीत असल्याचे दिसून आले होते, त्यामुळे आयुक्तांनी त्यालाही दणका दिला आहे.
लक्ष्मण नावजी आढारी असे निलंबित पोलिस शिपायाचे नाव आहे. तो पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनीट चारमध्ये नेमणुकीस होता. त्याने रेकॉर्डवरील गुन्हेगार अक्षय गोविंद पाटील याला खेड तालुक्यातील चाकण पोलिस ठाण्यातील गोपनीय माहिती पुरवली आहे. चाकण पोलिस ठाण्यातील अत्यंत गोपनीय असे मोबाईल सिडीआर रेकॉर्ड आढारी याने पाटील याला देऊन मदत केली होती. त्याबद्दल आढारी याच्यावर आयुक्त कृष्णप्रकाश यांनी तातडीने निलंबनाची कारवाई केली आहे.