डहाणू. (प्रतिनिधी) – उद्घाटनाच्या आधी नवीन पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीत क्रांतिवीर बिरसा मुंडा यांचा पुतळा स्थापन करा असे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे ईमेल द्वारे पत्र पाठवून जोरदार मागणी केली आहे.
यावेळी आमदार कॉ. निकोले म्हणाले की, सागरी, डोंगरी अन् नागरी अंग असलेल्या देशातील सर्वांत मोठ्या ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून दि. 01 ऑगस्ट 2014 पासून नव्याने पालघर हा राज्यातील 36 वा जिल्हा अस्तित्वात आला. पालघर जिल्हयात आदिवासी लोकसंख्या मोठी आहे. वारली चित्रकला व तारपा नृत्य ही या जिल्हयाची सांस्कृतिक ओळख आहे. डहाणू तालुक्यातील घोलवडचे चिकू प्रसिध्द आहेत. जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने वारली, कातकरी, मल्हार कोळी इत्यादी आदिवासी जमाती आहेत. आदिवासी समाजाने आपला सांस्कृतिक वारसा जपला असून त्यामधील वारली चित्रकला व तारपा नृत्य ही त्यांच्या समाजजीवनाची ओळख आहे. वारली चित्रकारी आदिम काळापासून म्हणजे जेव्हा मनुष्य वास्तव्य करीत होता त्या काळापासून जतन केलेली आहे. तसेच बिरसा मुंडा ऐन तारुण्याच्या काळात, ब्रिटिश साम्राज्यवादाच्या विरुद्धच्या चळवळीचा एक भाग होते. भारतीय स्वांतत्र्य लढ्यातील क्रांतिकारक आणि आदिवासींच्या हक्कांसाठी लढणारे बिरसा मुंडा हे सुप्रसिद्ध असून आदिवासी समाजाचे वीर नायक अशी त्यांची ओळख आहे. 19 व्या शतकातील शेवटच्या वर्षात मुंडा जमातीच्या आदिवासींव्दारा इंग्रज सरकार विरूध्द जनआंदोलने केली त्याचे नेतृत्व बिरसा मुंडा यांनी केले होते. भारतीय स्वातंत्र्य लढयात हया आदिवासींच्या संग्रामास इतिहासात मोठे स्थान प्राप्त करून देण्याचे श्रेय बिरसा मुंडा यांनाच जाते. आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांचे चित्र भारतीय संसदेच्या मध्ये कक्षासमोर लावले गेले आहे. ते एकटेच क्रांतिकारक आहेत ज्यांना हा सन्मान मिळाला आहे. त्यानुसार पालघर जिल्हा आदिवासी बहुल जिल्हा असल्यामुळे या नवीन पालघर जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासकीय इमारतीच्या समोर म्हणजेच मुख्य प्रवेशद्वारा जवळ क्रांतिवीर बिरसा मुंडा यांचा पुतळा असला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. त्या अनुषंगाने आदिवासी समाजाच्या भावना ओळखून दि. 19 ऑगस्ट 2021 रोजीच्या उद्घाटनाच्या आधी जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासकीय इमारतीच्या समोर म्हणजेच मुख्य प्रवेशद्वारा जवळ क्रांतिवीर बिरसा मुंडा यांचा पुतळा स्थापन करावा असे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी ईमेल द्वारे पत्र मुख्यमंत्री, महसूल मंत्री, आदिवासी विकास मंत्री, सिकडो, संबंधित विभागाचे प्रधान सचिव यांच्या सह पालघर जिल्हाधिकारी यांना पाठवून मागणी केली आहे.