जिल्ह्यात वेठबिगारी पद्धत नाही असे जाहीर करण्याचा अधिकार जिल्हाधिकारी तथा जिल्हा न्याय दंडाधिकाऱ्यांचा आहे, पोलिसांना नाही.
गुन्ह्यांवर पांघरून घालण्यासारखे वक्तव्य करण्याचा अधिकार पोलिसांना दिला कोणी ?
आरोपी हा स्थानिक आमदार सुनील भुसारा यांचा निकटवर्तीय आहे म्हणून पोलिसांवर दबाव आहे का..? – विवेक पंडित यांचा सवाल.
मालक वर्गाने मजुरांना आगावू रक्कम (बायाना)देऊ नये, अन्यथा वेठबिगारी विरोधी कायद्यानुसार गुन्हे दाखल होतील.-विवेक पंडित यांचा मालक वर्गाला इशारा
*पालघर /दि.२६ ऑगस्ट *
मोखाडा येथील काळू पवार या शेतमजुराने वेठबिगारीतून केवळ ५०० रुपयांसाठी आत्महत्या केल्याच्या प्रकरणी पोलिस अधीक्षकांनी केलेल्या वक्तव्यावर राज्य स्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष, तथा, श्रमजीवी संघटनेचे संस्थापक श्री. विवेक पंडित यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. पालघर जिल्ह्यात वेठबिगारी किंवा इतर अनिष्ट प्रकार नाहीत हे पोलीस अधीक्षकांचे वक्तव्य दुर्दैवी असे म्हणत, गुन्ह्यांवर पांघरून घालण्यासारखे वक्तव्य करण्याचा अधिकार पोलिसांना दिला कोणी ? असा सवाल विवेक पंडित यांनी पत्रकार परिषदे दरम्यान केला आहे. तसेच मालक वर्गाने मजुरांना आगावू रक्कम (बायाना)देऊ नये, अन्यथा वेठबिगारी विरोधी कायद्यानुसार गुन्हे दाखल होतील असा इशारा देखील त्यांनी दिला.
पालघर जिल्ह्यात वेठबिगारी किंवा इतर अनिष्ट प्रकार नसल्याचे पालघरचे पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांनी दिनांक २४ ऑगस्ट रोजी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले. यावेळी त्यांनी बाळू पवार यांनी आत्महत्या केली त्या दिवशी (१३ जुलै) खूप पाऊस सुरू असल्याने त्यांच्या गावातच दफनविधी केल्याची माहिती पोलीस अधीक्षक यांनी दिली.शिवाय काळू पवार याला नेहमी दारू पिण्याची सवय होती आणि २ ऑगस्ट रोजी या आत्महत्या विषयी मोखाडा पोलिसांना प्रथम माहिती प्राप्त झाली असता मृताच्या पत्नीने कोणत्याही प्रकारचा संशय व्यक्त केला नसल्याचे पोलीस अधीक्षक यांनी म्हटले आहे.
परंतु, मृत काळू पवार याची पत्नी सावित्री पवार हिने आपल्या जबाबात नमूद केले आहे कि, २०२० च्या दिवाळी सणाच्या ५ दिवस अगोदर त्यांचा सर्वात छोटा मुलगा दत्तू (१२) याचा मृतदेह एका खोल दरीत आढळला होता. त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे त्यांना काहीच कळले नाही. परंतु, दत्तूच्या अंतिम संस्कार करण्यासाठीही पवार कुटुंबियांकडे पैसे नव्हते. शेवटी गावातील रामदास कोरडे या मालकाकडून कफन खरेदीसाठी ५०० रुपयाची उसनवारी करावी लागली, त्यावेळी हे पैसे कसे फेडायचे याबाबत विचारले असता, शेतीच्या कामावर येऊन फेडावे लागतील असे मालकाने सांगितल्याचे व त्याप्रमाणे तो गडी म्हणून काम करत होता असे मृत कळूच्या पत्नीने आपल्या तक्रारी दरम्यान पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.
त्यामुळे या प्रकरणी गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस अधीक्षक यांनी आहे प्रकारचे वक्तव्य करणे म्हणजे, गुन्ह्यांवर पांघरून घालण्याचा प्रकार आहे असे विवेक पंडित यांनी म्हटले आहे.
जिल्ह्यात वेठबिगारी पद्धत नाही असे जाहीर करण्याचा अधिकार जिल्हाधिकारी तथा जिल्हा न्याय दंडाधिकाऱ्यांचा आहे, पोलिसांना नाही.
पालघर जिल्ह्यात वेठबिगारी किंवा इतर अनिष्ट प्रकार नाहीत हे पोलीस अधीक्षकांचे वक्तव्य दुर्दैवी असून
गुन्ह्यांवर पांघरून घालण्यासारखे वक्तव्य करण्याचा अधिकार पोलिसांना दिला कोणी ? असा सवाल विवेक पंडित यांची उपस्थित केला आहे. तसेच,आरोपी हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा नेता असून, स्थानिक आमदार सुनील भुसारा यांचा निकटवर्तीय आहे. म्हणून पोलिसांवर दबाव आहे का..?असाही प्रश्न विवेक पंडित यांनी उपस्थित केला आहे.
आपल्या प्रशासनाने परिस्थिती स्वीकारायला पाहिजे. पोलिसांचा हेतू चांगला आहे. मात्र वेठबिगारी पद्धत नाही असे वक्तव्य करणे चुकीचे आहे. ते गुन्ह्याला पाठबळ देण्यासारखे आहे. पोलिसांना कायदा मान्य पाहिजे, त्याची अंमलबजावणी करणे हे पोलिसांचे काम आहे. तसेच,
वेठबिगारी पद्धत नाही असे जाहीर करण्याचा अधिकार जिल्हाधिकारी तथा जिल्हा नाय दंडाधिकाऱ्यांचा आहे. पोलिसांचा नाही. गुन्ह्यांचा तपास करणे हे पोलिसांचे काम आहे, सामाजिक न्यायाच्या दृष्टीने ताठस्थपणे कायद्याची अंमलबजावणी करणे हे पोलिसांचे आणि जिल्हा प्रशासनाचे काम आहे. व्यवस्था परिवर्तनाच्या बाजूने पोलिसाची भूमिका असायला पाहिजे, परंतु दुर्दैवाने याच्या विरोधी परिस्थिती आहे असे म्हणत पंडित यांनी खंत व्यक्त केली.
या पत्रकार परिषदेला मृत काळू पवार यांची पत्नी सावित्री काळू पवार आणि दोन मुली देखील उपस्थित होत्या. यावेळी सावित्री हिने सांगितले की, “रामदास कोरडे याने आम्हाला मुलाच्या कफनासासाठी ५०० रुपये दिले होते. नंतर आम्ही त्याला पैसे परत देत होतो, परंतु त्याने परत घेतले नाही, तू गडी म्हणून कामावर येऊन फेड असे तो म्हणाला. त्यानंतर त्याने एकही रुपया मजुरी दिली नाही. परंतु नंतर गुन्हा दाखल झाला तेव्हा त्याने कुणा मध्यास्ताच्या मदतीने मला २० हजार रुपये देण्याचा प्रयत्न केला, मात्र मी ते घेतले नाही असेही पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.