जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ तसेच तीर्थस्थळ असलेल्या चाळीसगाव तालूक्यातील पाटणा गावाजवळ ढगफुटी झाल्याची माहिती समोर येत आहे. काल रात्रभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे पाटणा गावाच्या आजुबाजूचा परिसर आणि पाच गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसेच जळगाव आणि औरंगाबाद या दोन जिल्ह्यांना जोडणारा कन्नड घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.
जिह्यातील चाळीसगाव तालूक्यातील प्रसिद्ध तीर्थ स्थळ असलेल्या पाटणादेवी परिसरात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस झाला. परिसरातून गिरणा नदी वाहते. नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. यामुळे पाटणादेवी परिसरातील पाच गावे पूराच्या पाण्याने वेढली गेली असल्याची प्राथमिक माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे. या गावांमधील वीज पूरवठा देखील खंडीत झाला आहे.
कन्ऩड घाटात दरड कोसळली
औरंगाबाद आणि जळगाव जिल्ह्याला जोडणाऱ्या कन्नड घाटात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे आधीच अरुंद असलेला घाटातील रस्ता प्रवासासाठी धोकादायक झाला होता. त्यात आता घाटात मोठी दरड कोसळल्याने दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णतः ठप्प झाल्याने अवजड वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत