गणेशोस्तवाचे 10 दिवस बघता बघता निघून गेले. गणेशभक्तांनी गणेश चतुर्थीला आपल्या लाडक्या बाप्पाचं स्वागत केलं. तर आज बाप्पाला निरोप द्यायचा दिवसंही उजाडला आहे. राज्यात अनेक ठिकाणी गणपती विसर्जनाला सुरुवात झाली आहे. तर मुंबईतील प्रसिद्ध ‘लालबागचा राजा’चा विसर्जन सोहळा सुरु झाला आहे.
दरम्यान लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीकडे निघाला आहे. लाडक्या लालबागच्या राजाची एक एक झलक पाहण्यासाठी आणि त्याचं दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली आहे. विसर्जन मिरवणुकीत मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सामील होऊ नये, असं आवाहन लालबागच्या राजाच्या मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांनी केलं होतं.
दुसरीकडे मुंबईचा राजा मानला जाणारा गणेशगल्लीचा बाप्पा विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे. मुंबईचा राजा गिरगाव चौपाटीच्या दिशेनं रवाना झालाय. या सोहळ्यात नागरिकांची गर्दी होऊ नये असं सतत आवाहन करण्यात येतंय.
तर पुण्यामध्ये मानाच्या दोन गणपतींचं विसर्जन करण्यात आलं आहे. पुणेकरांचं ग्रामदैवत पहिला मानाचा गणपती कसबा गणपतीचे पर्यावरण पूरक हौदात विसर्जन करण्यात आलंय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचं विसर्जन मंडळातच केलं जाणार आहे.