Palghar Nargrik

Breaking news

मुंबई अहमदाबाद महामार्ग मृत्यूचा महामार्ग. आठ महिन्याच्या 85 अपघातात 51 मृत्यू तर 92 जखमी……

पालघर: राज्यातील पाच महामार्गापैकी मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग हा अपघातांसाठी अतिधोक्यांचा महामार्ग ठरत आहे. या महामार्गावर विविध अपघातांमध्ये आच्छाड ते मेंढवण खिंड परिसरामध्ये नोंद असलेल्या 85 अपघातात सुमारे 51 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. याचाच अर्थ सरासरी सात मृत्यू दररोज होत आहेत. तर 92 जण जखमी झाल्याची नोंद आहे. जानेवारी ते ऑगस्ट 2021 या आठ महिन्याच्या कालावधीतील या नोंदी आहेत.

मुंबई-अहमदाबाद महामार्गचा हा सुमारे पंचावन्न किमीचा भाग मृत्यूचा सापळा बनत चालला आहे हे येथे होणाऱ्या अपघात मालिकांमधून समोर येत आहे. याच भागामध्ये अपघात प्रवण क्षेत्रही आहे. असे असले तरी महामार्ग प्राधिकरण प्रशासन, महामार्गाचे ठेकेदार व स्थानिक वाहतूक प्रशासन वाहतुकीच्या नियमांची अंमलबजावणी करत नसल्यामुळे वारंवार अपघात घडत असल्याचे सांगितले जात आहे. प्रशासनाच्या व महामार्गाच्या विविध कामांचा ठेका दिलेल्या ठेकेदार विरोधात काही अवजड वाहतूक संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. सहा ऑक्टोबर रोजी महामार्गावर पितृ अमावस्या च्या निमित्ताने येथे श्राद्ध आंदोलन केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

आच्छाड ते मेंढवण खिंड या परिसरामध्ये अनेक त्रुटी ठेवल्या गेल्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे. तसेच रस्त्यांवर नादुरुस्त झालेली वाहने हटवण्यात झालेली दिरंगाई ही अपघातांना कारणीभूत आहे. महामार्ग ठेकेदारामार्फत महामार्गाच्या दिशादर्शक फलकासह, सेवा रस्ते, मानवी सेवा रस्ते, वाहने वळवण्याचे ठिकाणे, धोकादायक वळणे, हॉटेल ढाब्याकडे जाणारी अनधिकृत वळणे अशा ठिकाणी विविध उपाययोजना करणे आवश्यक असताना तसे न केल्यामुळे वारंवार अपघात घडत असल्याचे सांगितले जात आहे. या विविध कारणांमुळे प्रवाशांसह वाहनचालकांचा नाहक बळी जात आहे. या भागामध्ये सर्वाधिक अपघात अवजड वाहनांचा होत आहे. अवजड वाहने वाहिनीची (लेन) शिस्त पाळत नसल्यामुळे अपघात घडत आहेत. यावर प्रशासनही गप्पच आहे. यासह प्रवासी वाहने, खाजगी प्रवासी वाहने यांचेही अपघात घडत आहेत. ज्वलनशील पदार्थ, नैसर्गिक घरगुती गॅस वाहतूक करणारे मोठे टँकरही याच परिसरातून जात असल्यामुळे एखादा मोठा अपघात घडल्यास एकाच वेळी अनेकांना आपला जीव गमवावा लागण्याची दाट शक्यता आहे.मात्र सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही रक्षक प्रणालीची व्यवस्था महामार्गावर नाही. कित्येक वर्षांपासून येथे अग्निशामन यंत्रणाही नाही.

 

महामार्गाच्या देखभाल दुरुस्ती ठेका दिलेल्या ठेकेदारामार्फत महामार्गावर नियोजनाचा अभाव असल्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे असे आरोप होत आहेत. याचबरोबरीने स्थानिक पोलिसांना एखादे बंद पडलेले वाहन बाजूला करावयाचे असल्यास या ठेकेदारामार्फत यंत्रसामुग्री न आणता खाजगी ठिकाणाहून बचाव कार्याची यंत्रसामुग्री मागवावे लागते. याच बरोबरीने एखाद्या ठिकाणी अपघात घडल्यास तातडीने ठेकेदारामार्फत रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही. परिणामी स्थानिक स्तरावरून रुग्णवाहिका उपलब्ध करावी लागते. अपघात झाल्यानंतर जखमींना तातडीने उपचार करणे आवश्यक असते. मात्र रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागल्याच्या घटना येथे घडत आहेत. या परिसरामध्ये अनेक वाहने तांत्रिक बिघाडामुळे नादुरुस्त होत असताना ती महामार्गावरून हटविण्यासाठी बराच वेळ जात आहे. त्यामुळेही उभी वाहने समजण्यास अडचणी निर्माण होऊन वाहनांच्या मागील बाजूने येणाऱ्या वाहनांचे अपघात घडल्याच्याही अनेक घटना घडल्याची नोंद आहे. अशा अनेक अपघातांच्या नोंदी होऊन अनेकांना आपले प्राण गमवावे लागल्याने महामार्गातील हा परिसर मृत्यूचा सापळा बनला आहे.

पितृ अमावास्येला होणार श्राद्ध आंदोलन
महामार्ग नियोजन देखभाल दुरुस्ती करणाऱ्या व वाहतूक नियमांची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणा तसेच ठेकेदार यांच्या मार्फत अपघातावेळी प्राथमिक उपचार बचावकार्य जीवरक्षक प्रणाली आदी सेवा वेळेवर पुरवल्या जात नसल्याने त्या मृत्यूशय्येवर आहेत या यंत्रणा व ठेकेदार यांच्या ही बाब लक्षात आणून देण्यासाठी व लक्ष वेधण्यासाठी महामार्गावर मेंढवण खिंड परिसरात पितृ अमावस्याच्या दिवशी श्राद्ध आंदोलन विविध संघटनांमार्फत आयोजित केलेले आहे

प्रतिक्रिया:
महामार्गाचे नियोजन व नियंत्रण करणाऱ्या यंत्रणेसह ठेकेदार यांच्या बेपर्वाईमुळे अनेक अपघातां मध्ये तातडीच्या उपाययोजना केल्या जात नाही या सेवा मृत्युशय्येवर आहेत सेवा मिळाव्यात म्हणून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी श्रद्धा आंदोलन केले जाणार आहे
हरबंस नन्नाडे, प्रतिनिधी, अखिल भारतीय वाहन चालक-मालक संघटना, गुजरात महाराष्ट्र महामार्ग

चौकट:
गेल्या पाच वर्षात मेंढवन ते आच्छाड रस्त्यावर मेंढवन भागात 421 अपघात झाले असून यामध्ये 26 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 289 प्रवाशी जखमी झाले आहेत. तसेच चारोटी या ठिकाणीही 302 अपघातामध्ये 32 मृत्यू झाले तर 285 चालक ,प्रवाशी जखमी झाले आहेत. धानिवरी या ठिकाणीही 120 अपघातामध्ये 12 जणांचा मृत्यू तर 110 जण जखमी झाले आहेत. आंबोली-तलासरी परिसरातसुद्धा 164 अपघातामध्ये 34 जणांचा मृत्यू व 128 जण जखमी झाले आहेत.

Jun to Aug 2021
अपघात नोंद … 30
मयत ….. 12
जखमी … 29

Jan to Aug 2021
अपघात नोंद ……85
मयत………51
जखमी…….92

Leave a Comment