महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष दररोज दिसत आहे. आता देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांचा भाजपात प्रवेश करत शिवसेनेला धक्का देत काँग्रेसच्या विरुद्ध निवडणूक लढवण्याचा भाजपाने ठरवले आहे. नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची आज भेट घेत शिवसेनेचा शिवबंध सोडत भाजपचं कमळ हातात घेण्याचं निश्चित केले आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यासह नांदेडचे खासदार प्रताप चिखलीकर नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पीक पाहणी दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान शिवसेनेचे देगलूरचे माजी आमदार सुभाष साबणे यांनी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस श्रावण पाटील यांच्या घरी फडणवीस यांची भेट घेतली साबणे यांनी भाजपात प्रवेश करत असल्याचं ‘झी मीडिया’ला सांगितले. ‘झी मीडिया’शी बोलताना सुभाष साबणे यांनी नांदेडचे पालक मंत्री अशोक चव्हाण यांची कार्यपद्धती एकाधिकारशाहीची असल्याची टीका केली.
देगलूर विधानसभेत विकास निधी शिवसेनेने आणायचा आणि त्याचे श्रेय पालक मंत्री अशोक चव्हाण घेत आहेत. शिवसैनिकांना आपल्या अधिकाराचा वापर करत चव्हाण यांनी यापूर्वीही अनेक वेळा त्रास दिला आहे. यामुळे आपण अशोक चव्हाण यांच्या विरोधात कठोर भूमिका घेणार असून पुढील काळात भाजपात प्रवेश करत विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले आहे.
देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून सुभाष साबणे यांना उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे.