देशात 2022 मध्ये मिनी लोकसभा निवडणुक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. भारतीय जनता पक्षाने निवडणुकांसाठी आपली तयारी सुरू केली आहे. यासाठी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची महत्वाची बैठक आज एनडीएमसी कन्वेंशन सेंटरमध्ये हायब्रिड स्वरूपात आयोजित करण्यात येईल. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 124 सदस्य उपस्थित असतील. तसेच इतर लोक वर्च्युअली बैठकीत सामिल होतील.
या राज्यांवर चर्चा
बैठकीत उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपुर या पाच राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीविषयी चर्चा होईल. यामध्ये विशेषतः उत्तरप्रदेश, उत्तराखंड आणि गोवा या राज्यांमध्ये भाजपा विजयासाठी पूर्ण ताकदीने उतरणार आहे. त्यामुळे ही कार्यकारिणी बैठक महत्वाची मानली जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या संबोधनात कोरोना, भारतीय अर्थव्यवस्थेतील सुधारणा, विधानसभा निवडणुका अशा अनेक मुद्द्यांवर बोलू शकतात. गरीब कल्याण योजनांवर सरकारतर्फे करण्यात आलेल्या कामांची माहिती देण्यात येईल. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा उपस्थित राहतील.
कोरोना प्रोटोकॉलमुळे आज राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत सर्व सदस्यांना बोलवण्यात आलेले नाही. परंतु संबधित राज्यांचे मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय कार्यसमितीच्या सदस्य प्रदेश कार्यालयातून वर्चुअली बैठकीत भाग घेतील.
पक्षाने नुकतेच कार्यसमितीमध्ये फेरबदल केले आहेत. मेनका गांधी आणि वरुण गांधी यांना कार्यसमितीतून वगळण्यात आले आहे. तर ज्योतिरादित्य सिंधिया, अश्विनी वैष्णव यांना टीममध्ये सामिल करण्यात आले होते.