पालघर (प्रतिनिधी)पालघर जिल्ह्यातील जेष्ठ विधीज्ञ, शिक्षणतज्ञ, सामाजिक कार्यकर्ते आणि सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीचे अध्यक्ष अॅड्. जी.डी. तिवारी यांना आय-बर्ड (International Board of Education research & Development) या आंतराष्ट्रीय संस्थेचा त्यांच्या अतुलनीय शैक्षणिक कामाबद्दल लाईफटाईम अचिवमेंन्ट अवॉर्ड (जीवनगौरव पुरस्कार) प्राप्त झाला आहे.
दिनांक २८ आणि २९ जानेवारी २०२२ रोजी संपन्न झालेल्या आय-बर्डच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन निकोशिया विद्यापीठ, सायप्रस, ओट्टो वॉन गुरीक विद्यापीठ, जर्मनी क्लारा कॉलेज ऑफ कॉमर्स, मुंबई आणि सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळी यांनी केले होते. शिक्षण, संशोधन आणि विकास हे सुत्र डोळयासमोर ठेवून सुमारे ४ वर्षापूर्वी आय-बर्ड या आंतरराष्ट्रीय संस्थेची स्थापना झाली आहे. या संस्थेचे पहिले आंतरराष्ट्रीय अधिवेशन २०१८-२०१९ मध्ये इस्त्रायल मध्ये संपन्न झाले. दिनांक २८ आणि २९ जानेवारी २०२२ रोजी संपन्न झालेल्या आय-बर्डच्या अधिवेशनात प्रसिध्द नोबेल पुरस्कार विजेते प्रो. जिन मेरी लीन, अमेरिकास्थित प्रसिध्द उद्योगपती थिनक्यु फार्मासीटीकल कंपनीचे मालक डॉ. मुकुंद चोरघडे यांच्यासह सोनोपंत दांडोकर शिक्षण मंडळीचे अध्यक्ष अॅड्. जी. डी. तिवारी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
अॅड्. जी. डी. तिवारी हे गेल्या ६ दशकांपासुन पालघर आणि ठाणे जिल्हयातील राजकिय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात समर्पित वृत्तीने कार्यरत आहेत. जेष्ठ आणि अत्यंत कुशल विधिज्ञ म्हणुन त्यांनी हजारो नागरीक आणि संस्थाना मौलिक मार्गदर्शन आणि सहाय्य केले आहे. प्रतिक सेवा मंडळाचे मुकबधिर विद्यालय सुरू करून शेकडो गरीब मुकबधिर मुला-मुलींना आधार दिला आहे. तसेच आपल्या लिखाणाद्वारे अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडण्याचे काम त्यांनी केले आहे.
अॅड्.जी.डी. तिवारी हे गेल्या ५ दशकांपासून सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळींशी घनिष्ठ्पणे आणि सक्रियपणे जोडले गेले आहेत. २००४ पासून गेली १८ वर्षे ते या संस्थेचे अध्यक्षपद भुषवित आहेत. त्यांच्या कार्यकाळात संस्थेच्या विविध महाविद्यालयाची अत्यंत वेगाने प्रगती झाली असुन संस्थेला नावलौकिक प्राप्त झाला आहे. सध्या या संस्थेमध्ये सुमारे १३००० विद्यार्थी विविध शाखांमध्ये शिक्षण घेत आहेत. त्यांच्या कार्यकाळात मुंबई विद्यापीठातील सर्वोत्कृष्ट महाविद्यालय, देशातील सर्वोत्कृष्ट महविद्यालय इत्यादी अनेक बहुमान संस्था व महाविद्यालयाला प्राप्त झाले आहेत.
पालघर जिल्हयाचे काँग्रेसचे पदाधिकारी, लायन्स क्लबचे संस्थापक अध्यक्ष आणि अनेक स्वयंसेवी संस्थेचे आधारस्तंभ या माध्यमातुन त्यांनी अनेक समाजोपयोगी कामे केली आहेत.
अॅड्.जी.डी. तिवारी यांच्या बहुमोल शैक्षणिक व सामाजिक योगदानाची दखल राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली आहे. अशी प्रतिक्रीया सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीचे प्राचार्य डॉ. किरण ज. सावे यांनी दिली आहे.
अड्. जी.डी. तिवारी यांच्या या भरीव कामगिरीबद्दल सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीचे उपाध्यक्ष धनेश वर्तक सचिव प्रा.अशोक ठाकुर व अतुल दांडेकर, कोषाध्यक्ष हितेंद्र शहा, आणि सहसचिव जयंत दांडेकर व संस्थेचे पदाधिकारी तसेच विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. पायल चोलेरा आणि सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे उपप्रचार्य प्रा.महेश देशमुख आणि डॉ.तानाजी पोळ यांनी अभिनंदन केले आहे.