शिवभक्तांना प्रवचन,भजन,किर्तनाची पर्वणी
भरत गवारी,जव्हार
दि.२ मार्च २०२२.
जव्हार शहराला संस्थानकालिन ऐतिहासिक वारसा लाभलेल्या जव्हारच्या प्राचीन शिवमंदिरात शिवराञी निमित्त शिवभक्तांचा उत्साह पाहायला मिळाला. सर्व शिवमंदिरांत भक्तांची मांदियाळी पाहावयास मिळाली. गेल्या दोन वर्षापासुन कोरोना महामारीने शिवराञी उत्सव होऊ शकले नव्हते.त्यामुळे याञा हि भरत नव्हत्या. मात्र यंदा शिवराञी उत्सवावर कोरोना सावट नसल्याने जव्हार शहरातील शिवमंदिरे दर्शनासाठी भाविकांनी गजबजली होती. सकाळ पासुन मंदिरांभोवती भक्तांच्या रांगा लागल्या होत्या.
जव्हार शहरात असलेले प्राचीन श्री बाणेश्वराचे मंदिर ही रोषणाईने,सजावटीने सजले होते. जव्हार पासून अवघ्या ८ कि.मी वर असलेले निसर्गाच्या कुशीत वसलेले बाळकापरा येथील जयेश्वर मंदिर शिवभक्तांनी फुलले होते.मंदिराच्या परिसरात बोरकर बाबांची समाधी आहे. याठिकाणी भाविकांसाठी भजन ,किर्तनाचा कार्यक्रम ठेवला होता.तसेच, बाळकापरा येथे याञोत्सव भरला होता.खेळण्याची दुकाने,खाऊची दुकाने रस्त्याच्या दुतर्फा व्यावसायिकांनी लावली होती.त्यामुळे बच्चे कंपनी खुश होती. तसेच, जव्हार पासुन १० कि.मी अंतरावर असलेले जामसर जवळील देवतळीचे श्री स्वयंभू शिव मंदिर शिवभक्तांना दर्शनासाठी पर्वणी ठरले.ह्या ठिकाणी भजन,किर्तनाच्या कार्यक्रमांत भाविक तल्लीन झाले होते.मोठ्यां प्रमाणेच बाल गोपाळ फुगड्या खेळण्यात रमले होते. देवतळी येथील प्राचीन शिल्प,मुर्त्या, देवतळीचा कमळ पुष्प फुललेला तलाव आलेल्या भाविकांना आकर्षित करत होता. देवतळीच्या शिवमंदिरात महाशिवराञी व श्रावण सोमवारी याञा भरते.या ठिकाणी पंचक्रोशीतील भाविक दर्शनासाठी येत असतात.
देवतळी पासून ३ कि.मी असलेल्या खरवंद पैकी तांबडमाळ येथील श्री शिवदत्तेश्वर महादेव मंदिर निसर्गाच्या सानिध्यात पाहावयास मिळते.हे शिवमंदिर हि शिवभक्तांना खुणावते आहे. तेथे हि शिवभक्त दर्शनासाठी महाशिवराञीला येत असतात.येथे मंदिराच्या जवळच विश्व नाथ बाबांची समाधी पाहायला मिळते.मात्र हे श्री शिवदत्तेश्वराचे मंदिर आज हि शिवभक्तांची आतुरतेने वाट पाहत आहे.अशा भास भाविकांना होतो.