तलासरी. – शेतकरी व कामगारांच्या मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांच्या नेतृत्वाखाली आज चक्क मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग रोखला गेला.
यावेळी आ. निकोले म्हणाले की, शेतकऱ्यांच्या मागण्या – डिजेल, पेट्रोल, गॅसच्या आकाशाला भिडलेले भाव कमी करणे, बेकायदेशीर विजेचा दर आकारणे बंद करणे, मुंबई-वडोदरा एक्सप्रेसवे मध्ये चाललेला भ्रष्टाचार त्वरीत थांबविणे, तसेच कामगारांच्या मागण्या – श्रम संहिता रद्द करणे, कामगारांची वेतन वाढ करणे, महाराष्ट्र नेटवर्क लिमिटेड कं. (सद्भाव इंजि. लि.प्रा.कं.) घरी बसविलेल्या कामगारांना त्वरीत रुजू करणे, चेकपोस्ट वरती चालणारा भ्रष्टाचार बंद करणे आदी मागण्यांसाठी पालघर जिल्ह्यातील तलासरी येथील दापचरी चेक पोस्ट वरती बेमुदत रस्ता रोको करण्यासाठी आपण इथे जमलो आहोत.
दरम्यान मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग सुमारे 01 तासाच्या वर रोखून धारण्यात आला असता याप्रसंगी उप विभागीय पोलीस अधीक्षक धनाजी नलवडे व तलासरी पोलीस निरीक्षक सतीश शिवरकर यांच्या मध्यस्थीने महाराष्ट्र चेक पोस्ट वरील व्यवस्थापक मंगेश मोरे, दयानंद शिंदे यांनी कामगारांना कामावर रुजू करण्याचे सांगितल्यावर रस्ता रोको मागे घेण्यात आला.
यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष डहाणू विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले, जिल्हा कमिटी सचिव किरण गहला, डहाणू तालुका सचिव रडका कलंगडा, तलासरी तालुका सचिव लक्ष्मण डोंबरे, किसान सभेचे नेते चंद्रकांत घोरखाना, जनवादी महिला संघटनेच्या नेत्या लहानी दौडा, जिल्हा परिषदेचे सभापती रामू पागी, तलासरी पंचायत समितीचे सभापती नंदू हाडळ व उपसभापती राजेश खरपडे, तलासरीचे नगराध्यक्ष सुरेश भोये व उपनगराध्यक्ष सुभाष दुमाडा, पंचायत समिती सदस्या सुनीता शिंगडे आदी उपस्थित होते.