राज्यसभेसारखीच (Rajyasabha Election) विधानपरिषदेची (Vidhan Parishad) निवडणूक जोरदार रंगणार असल्याचं स्पष्ट झालंय. कारण अपक्ष उमेदवार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी माघार घेतली असली तरी भाजपसह मविआनंही आपला पाचवा उमेदवार निवडणुकीत कायम ठेवलाय. त्यामुळे आता विधानपरिषदेच्या निवडणुकीत चुरस रंगणार आहे.
विनविरोध निवडणूक करण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीनं काँग्रेसवर एक उमेदवार मागे घेण्यासाठी दबाव टाकला होता. मात्र काँग्रेसनं आपला दुसरा उमेदवारही कायम ठेवला. त्यामुळे आता 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत. यात भाजपचे 5 तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसनेचे प्रत्येकी 2 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
भाजपाच्या पाठिंब्यावर अर्ज भरलेले अपक्ष उमेदवार सदाभाऊ खोत यांनी अर्ज मागे घेतला आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर अर्ज मागे घेत असल्याचं सदाभाऊ यांनी म्हटलं आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे तिसरे उमेदवार शिवाजीराव गर्जे यांनीही उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.
हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
भाजपाकडून प्रविण दरेकर, राम शिंदे, प्रसाद लाड, उमा खापरे आणि श्रीकांत भारतीय यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
शिवसेनेकडून सचिन अहिर आणि आमशा पाडवी हे दोन निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काँग्रेसकडून भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे निवडणुकीच्या मैदानात आहेत.
भाजपकडून प्रसाद लाड आणि काँग्रेसकडून भाई जगताप यांनी आपले अर्ज कायम ठेवले. त्यामुळे 10 जागांसाठी 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.