Palghar Nargrik

Breaking news

Ashadhi Wari : पालखी सोहळ्यानिमित्त वाहतुकीत बदल; दिवे आणि बोपदेव घाट तीन दिवस बंद…..

पुणे : संत ज्ञानेश्‍वर महाराज (Sant Dyaneshwar Maharaj) आणि संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj) यांच्या पालख्या सध्या पुण्यात मुक्कामी आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. वाहतूक बदल लक्षात घेऊन पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले आहे.
पुणे ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीतून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी पुणे-सासवड-लोणंद मार्गे पंढरपूर अशी जाते. तर संत तुकाराम महाराज पालखी पुणे ते सोलापूर मार्गाने रोटी घाटमार्गे बारामती इंदापूर अकलूज मार्गे पंढरपूरला जाते. या दोन्ही पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने या मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी 24 ते 28 जून या कालावधीत तर संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी 24 जून ते 5 जुलै या कालावधीत पालखी मार्गावरील पालखी मुक्कामाच्या गावांमध्ये सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे,
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गातील वाहतूक बदल :

पुणे ते सासवड (सासवड मुक्काम) – 23 जूनच्या रात्री 11 वाजल्यापासून ते 26 जूनच्या रात्री 8 वाजेपर्यंत पुण्याकडून सासवडकडे दिवे घाट व बोपदेव घाट मार्गे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहील. ही वाहतूक खडीमशीन चौक- कात्रज- कापूरव्होळमार्गे सुरू राहील. सासवड बाजूकडून येणारी सर्व वाहतूक गराडे-खेड शिवापूर मार्गे पुण्याकडे येईल.
सासवड ते जेजुरी (जेजुरी मुक्कम) व जेजुरी ते वाल्हे (वाल्हे मुक्काम) – 26 आणि 27 जून या कालावधीत पुणे येथून सासवड- जेजुरी- वाल्हे- निराकडे तसेच निरा येथून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांनी झेंडेवाडी- पारगाव मेमाणे- सुपे- मोरगांव- नीरा या मार्गाचा वापर करावा.
वाल्हे ते लोणंद (लोणंद मुक्कम)- 27 जून रोजी रात्री 11 वाजता ते 28 जून रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत पुणे येथून सासवड- जेजुरी- वाल्हे- निराकडे तसेच निरा येथून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांनी सासवड- जेजुरी- मोरगांव या पर्यायी मार्गाचा वापर करावा.
लोणंद येथून पुढे फलटण मार्गे- 25 ते 28 जून या कालावधीत फलटण- लोणंद येथून पुणे येथे येणारी वाहतूक शिरवळ मार्गे पुण्याकडे येईल. तसेच पुणे येथून फलटण-लोणंदकडे जाणारी वाहतुक शिरवळ मार्गे जाईल.
संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील पर्यायी वाहतूक मार्ग

लोणीकाळभोर ते यवत (यवत मुक्काम)- 25 जून रोजी पहाटे 2 ते रात्री 10 वाजेपर्यंत पुणे बाजूकडून सोलापूरकडे जाणारी वाहने वाघोली- केसनंद- राहू- पारगांव- चौफुला या मार्गाचा वापर करतील. तसेच सोलापूर बाजूकडून पुण्याकडे येणारी वाहतूक चौफुला- पारगांव- राहू- केसनंद- वाघोली या मार्गाचा वापर करतील.
यवत ते वरवंड ( वरवंड मुक्कम)- 26 जून रोजी पहाटे 2 ते रात्री 10 वाजेपर्यंत पुणे बाजूकडून सोलापूरकडे जाणारी वाहने थेऊर फाटा- केसनंद- राहू- पारगांव- न्हावरे- काष्टी- दौंड- कुरकुंभ या मार्गे जातील. सोलापूर बाजूकडून येणारी वाहने कुरकुंभ- दौंड- काष्टी- न्हावरे- पारगांव- राहू- केसनंद- वाघोली या मार्गाचा वापर करतील.
वरवंड ते उंडवडी, ता. बारामती (मुक्काम उंडवडी)- 27 जून रोजी पहाटे 2 ते रात्री 10 वाजेपर्यंत पुणे बाजूकडून सोलापूरकडे जाणारी वाहने चौफुला- पारगांव- न्हावरे- काष्टी- दौंड- कुरकुंभ या मार्गाचा वापर करतील. तसेच सोलापूर बाजूकडून पुणे बाजूकडे येणारी वाहतूक कुरकुंभ- दौंड- काष्टी- न्हावरे- पारगांव- चौफुला- वाघोली- पुणे या मार्गाचा वापर करतील.
बारामती ते पाटस आणि बारामती ते दौंड हे रस्ते बंद राहतील. सदर रस्त्यांवरील वाहतूक भिगवन मार्गे बारामतीला जाईल. बारामतीकडून येताना भिगवण मार्गे सोलापूर- पुणे महामार्गावर येईल. बारामती पाटस जाणारी वाहने ही बारामती- लोणीपाटी- सुपा- चौफुला- पाटस या मार्गाने जातील. तसेच पाटस- बारामती जाणारी वाहने पाटस- चौफुला- सुपा- लोणीपाटी- बारामती या मार्गाने जातील.
उंडवडी ते बारामती (बारामती मुक्काम) – 28 जून रोजी पहाटे 2 ते रात्री 9.30 वाजेपर्यंत बारामती ते पाटस व बारामती ते दौंड हे रस्ते बंद राहतील. ही वाहतूक भिगवन मार्गे बारामतीला जाईल. बारामतीकडून येताना भिगवन मार्गे सोलापूर-पुणे महामार्गावर येईल.
बारामती ते सणसर ( सणसर मुक्काम)- 29 जून रोजी पहाटे 2 ते रात्री 10 वोजपर्यंत जंक्शन ते बारामती हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात येईल. वालचंदनगर व इंदापूरकडून येणारी वाहतुक जंक्शन येथून कळसमार्गे बारामती- आष्टी वळविण्यात येईल. बारामतीकडून येणारी वाहतूक भिगवण- कळसमार्गे जंक्शनकडे जाईल.
सणसर ते अंथुर्णे (अंथुर्णे मुक्काम) तसेच अंथुर्णे ते निमगांव केतकी (निमगांव केतकी मुक्काम)- 30 जून व 1 जुलै रोजी पहाटे 2 ते रात्री 10 वाजेपर्यंत बारामतीकडून इंदापूरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने बारामती- कळंब- बावडा- इंदापूर या मार्गे किंवा बारामती- भिगवण- इंदापूर या मार्गे जातील. इंदापूरकडून बारामतीकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने इंदापूर- बावडा-कळंब- बारामती या मार्गे किंवा इंदापूर- भिगवण- बारामती या मार्गे जातील

Leave a Comment