पहिल्याच पावसापासून अनेक खड्ड्यांनी रिंगण केल्यामुळे येथून ये-जा करणाऱ्या वाहन चालकांना आपला जिव मुठीत घेऊन वाहने हाकत प्रवास करावा लागत आहे.अजून किती प्रवाश्यांचा बळी अथवा जीव गेल्यावर किंवा अधिक किती जण गंभीर जखमी झाल्यावर हे खड्डे भरले जातील असा सवाल प्रवाशी वर्गातून व्यक्त केला जात आहे.
या बाबत ही समस्या वृत्तपत्रांनी संबंधित खात्याच्या निदर्शनास आणून देखील येथील खड्डे न बुजवता प्रवासी व वाहतूक करणाऱ्यांच्या जीवाशी हे खाते खेळत असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.मुंबई-अहमदाबाद महामार्गावर खड्ड्यांनी रिंगण केले असून चारचाकी सह दुचाकी आणि तीन चाकी वाहनांना मोठी कसरत करावी लागत असल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. पडला पाऊस की पडला खड्डा, हा महामार्गावरील … खरे तर सगळीकडचाच सार्वत्रिक अनुभव. दरवर्षी ही समस्या उद्भवते.खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांत नागरिक जीव गमावतात.त्यांना आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. तरीही त्यावर कायमस्वरूपी तोडगा कधीच काढला जात नाही. की, खड्डे पडण्यामागे, ते बुजवण्यामागे केवळ अर्थकारण आहे? सामान्यांना हा प्रश्न सतावणारच आणि ते गाणे गातच राहणार… खड्डे मे रहने दो… घोटाळ्यांमुळे रस्त्यांची लागते वाट
साधारणपणे पावसाळ्यात रस्त्यांचे डांबरीकरण होते आणि रस्ता मजबुतीकरणाच्या दाव्यांची हवा निघून जाते. ठेकेदार कंपनी आणि रस्त्याच्या मालकीच्या एजन्सीजमधील भ्रष्टाचार हेही या खड्डे वाढण्याचे प्रमुख कारण आहे. कंत्राट मिळवण्यासाठी क्लार्कपासून अधिकाऱ्यांपर्यंत खिसे गरम करावे लागतात, ज्यामुळे बांधकामाच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. रस्त्यांच्या दुरुस्तीमध्ये ठेकेदारांकडून निकृष्ट काम करण्यात आल्याचे समोर आले होते. अशा परिस्थितीत कंत्राटी कामाशी निगडित लोकांसाठी कडक नियम केले पाहिजेत.
नक्षली हल्ल्यात प्राण गमावलेल्यांपेक्षा अधिक खड्डेबळी
देशभरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात मृत झालेल्यांची संख्या ही विशेष म्हणजे देशभरात नक्षली हल्ल्यात प्राण गमावलेल्यांपेक्षा जास्त आहे.त्याच प्रमाणे सुरत – दहिसर या महामार्ग चे,सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट मार्फत “स्ट्रक्चरल ऑडिट आणि सेफ्टी ऑडीट” करण्याची मागणी सुध्दा करण्यात येत आहे.