दोन वर्षाच्या संकट काळानंतर आलेला यंदाच्या गणेशोत्सवात मोठ्या उत्साहाचे वातावरण दिसून येत असून गणेशोत्सव खरेदीसाठी बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. उत्साहाचे वातावरण आणि गणेश उत्सवात सुरक्षा व्यवस्था अबाधित राखण्यासाठी पालघर पोलिसांनी अतिरिक्त पोलीस फौजफाटा तैनात केला आहे. तसेच पालघर जिल्ह्यात घरगुती ८४८८ तर सार्वजनिक १८५५ गणपतीची स्थापना होणार आहे.
गणेशत्सव सणाचे अनुषंगाने पालघर जिल्ह्यात कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही त्याकरिता पालघर पोलिसांकडून १ पोलीस अधिक्षक, १ अप्पर पोलीस अधिक्षक, ४ उपविभागीय पोलीस अधिकारी, ८१ पोलीस अधिकारी, ५९१ पोलीस अंमलदार, ४०० होमगार्ड, ४ स्ट्रायकिंग फोर्स, २ दंगल नियंत्रण पथक व २ राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या असा पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार आहे. दरम्यान, गेल्या दोन वर्षांपासून करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मर्यादित स्वरूपात गणेशोत्सव साजरा करण्यात येत होते. परंतु ह्या वर्षी कोरोना विषाणु महामारीनंतर गणेशत्सव सण मोठ्या उत्साहाने साजरा होणार आहे.
कायदा सुव्यवस्था बिघडेल,असे कुठलेही कृत्य करू नका,असे आवाहन पोलिसांनी केले आहे.दोन वर्षापासून गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट पसरले होते.यंदा मात्र, कुठल्याही निर्बंधाविना गणेशोत्सव मोठया धुमधडाक्यात साजरा होत असून त्याचा उत्साह सर्वत्र दिसून येत आहे.अवघ्या दोन दिवसानंतर येऊन ठेपलेल्या आतल्या आवडत्या बाप्पाच्या आगमनासाठी पालघर नगरी सज्ज झाली आहे.खरेदीची लगबग वाढली असून सर्वत्र बाजारपेठा फुलून गेल्या आहेत.यावेळी कायदा व्यवस्था अबाधित राहावी म्हणून पोलिसांनी खबरदारीचे सर्व उपाय योजले आहेत.