Palghar Nargrik

Breaking news

मुंबई-अहमदाबाद मार्गावर भीषण अपघातात सायरस मिस्त्री यांचा मृत्यू……

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष आणि शापूरजी-पालनजी समूहाचे वारसदार सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, पालघरच्या चारोटी परिसरात त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये सायरस मिस्त्री यांचा मृत्यू झाला आहे. मुंबई-अहमदाबाद मार्गावर सूर्या नदीवरील पुलावर सायरस मिस्त्री यांची मर्सिडीज कार दुभाजकाला धडकली. या अपघातामध्ये मिस्त्री यांच्या गाडीचा चालक गंभीर जखमी झाला आहे. तर सायरस मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला. चालकाचे गाडीवर नियंत्रण न राहिल्याने हा अपघात घडल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. दुपारी साडेतीनच्या सुमारास हा अपघात घडला. रुग्णालयात नेण्यापूर्वीच सायरस मिस्त्री यांचे निधन झाले होते. त्यांचे पार्थिव आता टाटा रुग्णालयातून गुजरातमधील त्यांच्या घरी नेले जाणार आहे.

सायरस मिस्त्री हे २०१२ ते ऑक्टोबर २०१६ या काळात टाटा सन्सचे अध्यक्ष होते. लंडनमधील इंपिरियल महाविद्यालयातून सायरस मिस्त्री यांनी इंजिनिअरिंगची पदवी घेतली होती. लंडन बिझनेस स्कूलमधून त्यांनी व्यवस्थापनाचे शिक्षण घेतले होते. टाटा सन्सच्या अध्यक्षपदाचा त्यांचा कार्यकाळ वादग्रस्त ठरला होता.सुशासन आणि पारदर्शकी व्यवस्थापनाचा आग्रह धरणाऱ्या सायरस मिस्त्री यांनी टाटा समूहावर गंभीर आरोप केले होते.

टाटा समूहाला २०१९ मध्ये १३००० कोटींचा तोटा झाला होता मात्र तो त्यांनी लपवला, असा आरोप मिस्त्री यांनी केला होता. तीन दशकांत पहिल्यांदाच टाटा समूहाला इतका प्रचंड तोटा झाला असून तो त्यांनी लेख परीक्षणात दडवला, असा दावा मिस्त्री यांनी कोर्टात सादर केलेल्या शपथपत्रात केला होता. याच वादातून २०१६ साली त्यांची टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. मिस्त्री यांनी या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने सायरस मिस्त्री यांची हकालपट्टी योग्य ठरवली होती.

Leave a Comment