Palghar Nargrik

Breaking news

तत्कालीन पालघर पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांच्या विरोधातील तक्रार याचिका एस.पी.सी.ए. कोर्टाने फेटाळली……

स्थानिक गुन्हे शाखा पी.एस.आय. हितेंद्र विचारे यांचीदेखील आरोपातून निर्दोष मुक्तता

आगरी सेनेचे निमेश वसा यांनी पालघर पोलीस दलाचे मनोधैर्य खच्ची करण्यासाठी व प्रतिमा मलिन करण्यासाठी खोटी तक्रार केल्याचे निष्पन्न.

दक्ष नागरिक सामाजिक संस्थेच्या अनिकेत वाडिवकर यांची पालघर पोलीस दलास मोलाची मदत.

महाराष्ट्र पोलीस ऍक्ट सुधारणा 2014 च्या कलम 22 (टी) अन्वये आर.टी.आय. ॲक्टिविस्ट निमेश वसा यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची गौरव सिंग यांची मागणी

राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाचे मा. न्यायमूर्ती श्रीहरी डावरे यांच्या अध्यक्षतेखालील डिव्हीजन बेंच कोर्टाने आपल्या अंतिम निकालाद्वारे तत्कालीन पालघर जिल्हा पोलिस अधीक्षक श्री. गौरव सिंग व स्था.गु.शा वसई पो.उप निरिक्षक श्री. हितेंद्र विचारे यांना चांगलाच दिलासा दिला आहे. तर दुसरीकडे याचिकाकर्ते निमेष वसा यांना चांगलीच फटकार लगावली आहे.

पालघर जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक श्री. गौरव सिंग आणि स्था.गु.शा. वसईचे तत्कालीन पो. उप. निरिक्षक श्री. हितेंद्र विचारे यांच्या विरोधात प्राधिकरणाकडे दाखल असलेली तक्रार याचिका निकाली निघाली असून मा. न्यायमूर्ती श्रीहरी डावरे यांनी बुधवार दिनांक ३० नोव्हेंबर २०२२ रोजी एका महत्वपूर्ण निकालाद्वारे आगरी सेनेचे कायदेशीर सल्लागार व आर.टी.आय. ॲक्टीविस्ट श्री. निमेष वसा यांची तक्रार याचिका फेटाळली आहे. आपल्या तब्बल ३४ पानी निकालपत्रात मा. न्यायमूर्तींनी तक्रारदार श्री. निमेष वसा यांच्याबाबत अनेक गंभीर निरीक्षणे नोंदवली आहेत.

आगरी सेनेचे सल्लागार श्री. निमेष वसा व त्यांचे सहकारी श्री. अमित म्हात्रे, प्रसाद धोंड व जिनेश वसा यांनी डिसेंबर २०१८ मध्ये श्री. गौरव सिंग आणि श्री. हितेंद्र विचारे यांच्या विरोधात राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण मुंबई येथे तक्रार याचिका दाखल केली होती. सदरच्या याचिकेत त्यांनी तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक श्री. विजयकांत सागर व स्था.गु.शा. पालघर येथील पोलिस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांच्यावर देखील अतिशय गंभीर आरोप केले होते.

आर.टी.आय. ऍक्टिवीस्ट निमेष वसा हे माहिती अधिकाराचा दुरुपयोग करत असल्याची माहिती वसई विरार शहर महानगरपालिकेकडून पालघर पोलिसांना प्राप्त झाली आहे त्यामुळे वसा यांच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश प्रत्यक्ष श्री. गौरव सिंग यांनी दिलेले आहेत. हे आदेश चुकीचे असून पालघर पोलिसांच्या पुढील संभाव्य कारवाईपासून संरक्षण मिळण्यासाठी त्याचबरोबर आगरी सेनेच्या काही कार्यकर्त्यांना पालघर पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी खंडणीच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्यासाठी प्रयत्नशील असून त्यात अनिकेत वाडिवकर देखील संगनमताने पालघर पोलिसांना मदत करत असल्याचा आरोप करून या सर्व संबंधितांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम सुधारणा २०१४ चे कलम २२ (क्यू) (८) अन्वये अधिकारांचा दुरुपयोग केलेप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी निमेष वसा यांनी आपल्या याचिकेत केली होती. मात्र या मागणीचा अनुषंगाने आपला मुद्दा पटवून देण्यात आणि कोर्टासमक्ष आवश्यक पुरावे सादर करण्यात श्री. निमेष वसा पूर्णपणे अपयशी ठरले.

सदरच्या तक्रार याचिकेत प्रतिवादी क्रमांक एक श्री. गौरव सिंग आणि प्रतिवादी क्रमांक दोन श्री. हितेंद्र विचारे यांच्यातर्फे प्रतिनिधी म्हणून दक्ष नागरिक सामाजिक संस्थेच्या श्री. अनिकेत वाडिवकर यांनी राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण कोर्टात गेली पाच वर्षे नियमित हजेरी लावली. तसेच निमेष वसा यांनी केलेल्या आरोपांना प्रतिवादी क्रमांक एक व दोन यांच्यातर्फे लेखी उत्तर दिले व तोंडी युक्तिवाद देखील सादर केला.

सदरच्या याचिकेची नियमित सुनावणी सुरू असताना उभय पक्षांतर्फे वेळोवेळी ९५० पानांचे दस्तऐवज पुराव्याकामी सादर करण्यात आले होते. या पुराव्यांच्या आधारे वादीपक्षातर्फे श्री. निमेष वसा यांनी आपली बाजू मांडली तर प्रतिवादी पक्षातर्फे श्री. अनिकेत वाडिवकर आगरी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी वसई विरार मधील शासकीय अधिकाऱ्यांबरोबर केलेल्या गैरवर्तणुकीचे व्हिडिओ फुटेज सादर करून निमेश वसा यांच्या आरोपातील हवा काढून घेतली. सुनावणीच्या अंतिम दिवशी मा. न्यायमुर्ती श्रीहरी डावरे यांनी निमेष वसा यांना चांगलेच फैलावर घेतल्याचे चित्र कोर्टात बघायला मिळाले.

आपल्या अंतिम निकालात मा. न्यायमूर्ती श्रीहरी डावरे यांनी स्पष्टपणे निमेष वसा यांची तक्रार याचिका फेटाळत असल्याचे नमूद केले आहे. तसेच स्थानिक गुन्हे शाखा पी.एस.आय. हितेंद्र विचारे यांचीदेखील आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे.

कोट :

महाराष्ट्र पोलीस ऍक्ट सुधारणा 2014 च्या कलम 22 (टी) अन्वये आर.टी.आय. ॲक्टिविस्ट निमेश वसा यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. आणि त्याचा पाठपुरावा आम्ही सुरूच ठेवणार आहोत. पोलीस दलाच्या विरोधात खोटे आरोप करणाऱ्यांना निदान आतातरी या निकालामुळे जरब बसेल. अनिकेत वाडिवकर यांनी पालघर पोलीस दलाची प्रतिमा उंचावण्यासाठी खरोखर मोलाची मदत केली आहे…..

श्री. गौरव सिंग (भा.प्र.से)
पोलीस उप आयुक्त वाहतूक मुंबई
तत्कालीन पोलीस अधीक्षक पालघर

कोट :

वसईमधील खंडणीखोर आर.टी.आय. कार्यकर्त्यांवर तब्बल सदोतीस खंडणीचे गुन्हे दाखल करणाऱ्या खंडणी विरोधी पथकात माझा समावेश असल्यामुळे माझ्यावर सर्वच आर टी आय कार्यकर्त्यांच्या राग होता त्यातूनच माझ्यावर खोटे नाटे आरोप करून माझे व माझ्या सहकाऱ्यांचे मनोधैर्य खच्ची करण्यासाठी सदरची तक्रार याचिका दाखल करण्यात आली होती. माननीय न्यायालयाने माझी यातून निर्दोष मुक्तता केलेली असून माझ्यावर खोटे आरोप करणाऱ्यांना चांगलीच चपराक दिली आहे. दक्ष नागरिक सामाजिक संस्थेचे अनिकेत वाडीवकर यांनी या खटल्याच्या निमित्ताने गेली पाच वर्षे दाखवलेली चिकाटी खरोखर प्रशंसनीय आहे ….

श्री. हितेंद्र विचारे, पी.एस.आय.
स्थानिक गुन्हे शाखा मिरा भाईंदर.

Leave a Comment