Palghar Nargrik

Breaking news

पंतप्रधान मोदी यांचा मुंबई दौरा, वाहतुकीत मोठा बदल…….

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज मुंबईत येणार आहेत. यावेळी ते 38 हजार कोटींच्या प्रकल्पांचं उदघाटन आणि पायाभरणी करणार आहेत. या दौऱ्यासाठी मुंबईतील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. संध्याकाळी मुंबईतील बीकेसीवर सभा होणार आहे. या सभेत मोदी काय बोलणार याचीही उत्सुकता आहे.

मुंबईत वाहतूक व्यवस्थेतअसा असेल बदल
मोदी यांच्या दौऱ्यामुळे मुंबईत वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागातर्फे विविध माध्यमांतून वेळोवेळी माहिती दिली जाणार आहे. माहितीसाठी हेल्पलाईन क्रमांक आणि ट्विटरवर संपर्क साधण्याचे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.

मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त बीकेसी आणि गुंडवली मेट्रो स्थानक बंद राहणार आहे तर 4.15 ते 5.30 वाजता या वेळेत वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर दक्षिण वाहिनी (कुलाबाकडे) तसेच 5.30 ते 5.45 या वेळेत उत्तरवाहिनी (दहिसरकडे) वाहतूक संथ गतीने सुरु राहणार आहे. पश्चिम दृतगती महामार्ग, धारावी, वरळी सिलींककडून बिकेसी परिसर कुर्लाच्या दिशेने जाणाऱ्या सर्व वाहनांना फॅमिली कोर्ट जंक्शनकडून पुढे कुर्ल्याच्या दिशेने जाण्यासाठी प्रवेश बंदी राहणार आहे.

मोदी यांच्या दौऱ्यावेळी हे मार्ग बंद
संत ज्ञानेश्वर मार्गावरून कुर्ल्याच्या दिशेने जाणाऱ्या सर्व वाहनांना इन्कम टॅक्स जंक्शनकडून पुढे बिकेसी परिसर कुर्ल्याच्या दिशेने जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. तर खेरवाडी शासकीय वसाहत कनाकीया पॅलेस, वाल्मीकी नगरकडून पुढे बीकेसी परिसर, चुनाभट्टी तसेच कुर्ल्याच्या दिशेची वाहतूक देखील बंद करण्यात आली आहे.

सुर्वे जंक्शन आणि रजाक जंक्शनवरुन बिकेसी परिसर, धारावी, वरळी सिलींकच्या दिशेने जाणाऱ्या सर्व वाहनांना एमटीएनएल जंक्शन येथून प्रवेश बंदी राहणार असून संपूर्ण बीकेसी परिसरामध्ये कोणीही त्यांची वाहने कोणत्याही रस्त्यांवर पार्किंग करणार नाहीत अशा सूचना वाहतूक आयुक्तांनी दिल्या आहेत.

सोशल मीडियात मोदींच्या सभेबाबत अफवा
नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्या आधी सोशल मीडियात मोदींच्या सभेबाबत अफवा पसरली आहे. मुंबईत काही व्यवसाय तसेच आस्थापना बंद राहतील अशा अफवांचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र या अफवांवर विश्वास ठेऊ नका. मुंबईतल्या सर्व आस्थापना सुरळीत सुरु राहणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांनीच दिली आहे. तेव्हा तुम्हालाही असा कोणता मेसेज आला असेल तर त्यावर विश्वास ठेऊ नका.

मोदींच्या दौऱ्यासाठी 250 हून अधिक एसटीचे आरक्षण
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यासाठी 250 हून अधिक एसटी बसेसचं बुकिंग करण्यात आलंय. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातून एसटी बसेस सुटणारेय. सूत्रांनी यासंदर्भात माहिती दिलीय. दसरा मेळाव्यानंतर पुन्हा एकदा एसटी बसचं मोठ्या प्रमाणात बुकिंग करण्यात आले आहे.

मोदींच्या या कामांचे होणार लोकार्पण
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत 38 हजार कोटींच्या प्रकल्पांचा शुभारंभ करणार आहेत. मोदींच्या हस्ते मेट्रो 2 ए आणि 7 चं लोकार्पण होईल. तर मनपाच्या बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याच्या 20 शाखांचंही लोकार्पण मोदींच्या हस्ते करण्यात येईल. पंतप्रधान स्वनिधी योजनेच्या एक लाखापेक्षा जास्त लाभार्थींना कर्जांच्या हस्तांतरणाचा प्रारंभही मोदींच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बीकेसी मैदानावर संध्याकाळी भव्य सभाही आयोजीत करण्यात आलीय. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लवकरच अपेक्षित आहे. गेल्या 25 वर्षांपासून मुंबईवर ठाकरेंचं राज आहे. यंदा मात्र मुंबई जिंकण्यासाठी भाजपने कंबर कसलीय. तेव्हा मोदींच्या हस्ते मुंबई महापालिका निवडणूक प्रचाराचाच नारळ फुटणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Leave a Comment