वर्षभरापासून सुटेना कचऱ्याची समस्या; नागरिकांचे आरोग्य धोक्यात…
बोईसर.पालघर – स्वच्छ भारत..स्वच्छ शहर’चा नारा देत आपले शहर व गाव स्वच्छ ठेवण्याकडे शासनाकडून आवाहन करण्यात येते. गाव आणि शहर स्वच्छतेवर मोठा भर देण्यात येत आहे. मात्र पालघर जिल्ह्यातील खैरा फाटक गावाची वाटचाल ही तेवढ्याच झपाट्याने अस्वच्छतेकडे होत असल्याने नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न येरणीवर आला आहे.
तारापूर औद्योगिक वसाहतीच्या लगत असणाऱ्या खैराफाटक ग्रामपंचायत क्षेत्रांमध्ये निर्माण होणाऱ्या घरगुती घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था नसल्याने हा कचरा बिरसा मुंडा मैदानाच्या शेजारी असलेल्या कचरा भूमीवर जाणीवपूर्वक टाकत आहेत. या कचऱ्याची योग्यरित्या पद्धतीने विल्हेवाट न लावता अधिकाअधिक कचरा टाकण्यासाठी जागा कशी मिळवता येईल यासाठी ग्रामपंचायतचे कष्ट जोरात चालू आहेत.कचरा कुजण्याची प्रक्रिया सुरू झाली असून वसाहत परिसरात आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे.गेल्या १५-२० वर्षांपासून औद्योगिक वसाहत परिसरातील ग्रामपंचायतीमध्ये निर्माण होणाऱ्या घरगुती कचऱ्याच्या व्यवस्थापनाचा प्रश्न प्रलंबित आहे. या भागात कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक अभ्यास झाला नसल्याने नेमका कशा पद्धतीचा व किती क्षमतेचा कचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारावा याबाबत निश्चित निर्णय झालेला नाही.
एमआयडीसीकडून वेगवेगळय़ा पद्धतीची करवसुली केली जात असून त्याचा ५० टक्के हिस्सा ग्रामपंचायतीला दिला जात आहे. त्यामुळे घरगुती कचरा व्यवस्थापन करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत झटकून टाकण्याचा प्रयत्न करीत असून ग्रामपंचायत हद्दीमधील एकत्रित होणारा कचरा जाणीवपूर्वक तारापूर औद्योगिक वसाहतीमधील वेगवेगळय़ा ठिकाणी टाकण्यात येत आहे, असे सांगितले जात आहे.
एमआयडीसी क्षेत्रात टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यामध्ये मृत जनावरे, प्लास्टिक पिशव्या तसेच ओल्या कचऱ्याचा समावेश असून संबंधित ग्रामपंचायत कचऱ्याचे वर्गीकरण करण्यास टाळाटाळ करत असल्याचे दिसून आले आहे. त्याचबरोबरीने प्लास्टिकबंदी संदर्भात राज्य सरकारचे स्पष्ट आदेश असूनही या आदेशांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे औद्योगिक वसाहतीमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या तसेच त्या परिसरातून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे.