पालघर. ( सलीम कुरेशी) – पालघर जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील विविध प्रकल्पांचे भूसंपादन या विषयी बैठक बोलावलेली होती. त्या बैठकीच्या आधी जोपर्यंत धानिवरी येथील विषय निकाली येत नाही तोपर्यंत आम्ही कोणत्याही बैठकीला बसणार नाही असा पवित्रा सर्व पक्षीय आमदारांनी घेतला असल्याची माहिती माकप आमदार विनोद निकोले यांनी दिली. यावेळी बविआ आ. राजेश पाटील, राष्ट्रवादीचे आ. सुनील भुसारा, शिवसेना (शिंदे गट) आ. श्रीनिवास वनगा आणि माजी खासदार बळीराम जाधव उपस्थित होते.
यावेळी आमदार निकोले म्हणाले की, 01) डहाणू धानिवरी येथील काब्जेदार शेतकऱ्यांना घराचा मोबदला 02) आपल्या उदरनिर्वाहसाठी लावलेल्या झाडांचा मोबदला 03) धानिवरी येथे अमानुषपणे आदिवासी कुटुंबियांना घराबाहेर काढले त्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबन करावे. 04) भूसंपादन केलेल्या जागेचा मोबदला मिळावा अश्या आमच्या मागणी आहेत. या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्हाला दुसऱ्या कोणत्याही बैठकीत बसण्यात कोणताही रस नाही. अशी आमची भूमिका आहे, असे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे 128 डहाणू (अ. ज) विधानसभा आमदार विनोद निकोले यांनी सांगितले.
दरम्यान सर्व पक्षीय आमदारांनी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायऱ्यांवर बसून जमीन आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची, प्रशासन की दादागिरी नहीं चलेगी, पोलीस की दादागिरी नहीं चलेगी अश्या जोरदार घोषणा दिल्या. यावेळी धानिवरी गावातील शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता.