Palghar Nargrik

Breaking news

Pune News : 60 हजार रुपयांत 10- 12 वी, बीए, बीकॉमची बनावट प्रमाणपत्रं विकणारी टोळी गजाआड…..

राज्याच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवणारी सर्वात मोठी बातमी नुकतीच समोर आली आहे. शिक्षणाचं माहेर घर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात टीईटीनंतर (TET Scam) आणखी एक घोटाळा समोर आला आहे. जिथं, नापास तरुणांना दहावी, बारावी बोर्डाचं बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. बनावट शैक्षणिक प्रमाणपत्र बनवणाऱ्या छत्रपती संभाजीनगरच्या टोळीने चक्क महाराष्ट्र स्टेट ओपन स्कूलसारखी बनावट वेबसाईट बनवण्याचं धडस करत 700 जणांना दहावी, बारावी, बीए, बीकॉमची बनावट प्रमाणपत्रं 60 हजार रुपयांत विकली.

सदर धक्कादायक प्रकरणात मुख्य सूत्रधाराने ‘अल हिंद विद्यापीठ’ नावाची वेबसाईट बनवली होती. त्यातूनच त्यानं आणि टोळीनं अनेकांना बोगस प्रमाणपत्र वाटली. या टोळीनं एजंटही नेमले होते. याप्रकरणी पोलिसांनी संदीप कांबळेसह तिघांना अटक केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

पोलिसांनी कसा रचला सापळा?
शिक्षण क्षेत्राला हादरवणाऱ्या या बातमीमध्ये पोलीस यंत्रणेनं महत्त्वाची भूमिका बजावली. सदरील घटनेबाबत माध्यमांशी संवाद साधताना पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी माहिती दिली. जिथं या टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी नेमका सापळा कसा रचला यावरून त्यांनी पडदा उचलला.

‘दहावीचे प्रमाणपत्र बनवून मिळत असल्याची माहिती मिळताच एक बनावट ग्राहक तयार करण्यात आला. ज्यानंतर स्वरगेट पोलीस स्थानकाच्या हद्दीअंतर्गत एक सापळा रचण्यात आला. जिथून संदीप कांबळे या आरोपीला ताब्यात घेण्यात आलं. त्याच्याकडे असणारा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला. त्याच आरोपीसोबत असणाऱ्यां एकूण चार आरोपींना अटक केली’, असं ते म्हणाले.

कोणत्याही ठिकाणी नोकरीसाठी किंवा उच्चशिक्षणासाठीही जायचं झाल्यास तिथं दहावी आणि बारावीच्या प्रमाणपत्राची पूर्तता करावी लागते. अनेकदा काही अडचणी निर्माण होऊन बऱ्याचजणांना या कागदपत्रांची पूर्तता करणं अशक्य होतं अशा तरुणांना जाळ्यात घेत त्यांना या टोळीनं बोगस प्रमाणपत्र देत हे जाळं आणखी विस्तारलं. प्राथमिक माहिती मिळाली तेव्हा त्यांनी 30 ते 35 तरुणांना प्रमाणपत्र वाटल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली होती. तपास पुढे गेला तेव्हा तब्बल 700 जणांना त्यांनी जाळ्यात ओढल्याची आकडेवारी समोर आली. यामध्ये BA आणि ITI चं प्रमाणपत्रही विकल्याची धक्कादायक बाब समोर आली.

दरम्यान, हे जाळं आणखी खोलवर पसरलं असून, त्याची पाळंमुळं शोधण्याचा प्रयत्न सध्या पोलीस करत आहेत. शिवाय ज्यांनी ही बनावट प्रमाणपत्र घेतली आहेत त्यांनी ती जमा करावीत अन्यथा कारवाईला सामोरं जाण्यासाठी तयार रहावं असं आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Leave a Comment