प्रवाशांना घेऊन जाणारी मासेमारीची एक बोट यूननाच्या समुद्रकिनाऱ्यापासून काही अंतरावर मध्यरात्री पलटल्याने मोठी दुर्घटना झाली आहे. या अपघातामध्ये 79 जणांचा मृत्यू झाला असून बरेच प्रवासी बेपत्ता आहेत. अधिकाऱ्यांना दिलेल्या माहितीनुसार हे सर्व प्रवासी यूनानमधून लपून छपून युरोपमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होते. मासेमारी करणाऱ्या बोटीमधून बेकायदेशीरपणे परदेशात जाण्याच्या प्रयत्नातच हा अपघात झाल्याने मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तटरक्षक दलाबरोबरच नौसेना आणि विमानांनी गस्त घालून रात्रभर या बुडालेल्या प्रवाशांचा शोध घेण्याची मोहीम हाती घेतली आहे. मात्र नेमके किती जण बेपत्ता आहेत हे समोर आलेलं नाही.
500 प्रवासी असल्याची शक्यता
बुडालेल्या बोटीमध्ये नेमके किती प्रवासी होते याचा अंदाज व्यक्त करणं कठीण आहे असं तटरक्षक दलाचे प्रवक्ते निकोलस अलेक्सियो यांनी ‘ईआरटी टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं. या 80 ते 100 फूट लांबीच्या जहाजामधील प्रवासी अचानक जहाजाच्या एका बाजूला गेल्याने जहाज बुडाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कालामाटाच्या दक्षिणेकडे असलेल्या शहराचे उपमहापौर अयोनिस जाफिरोपोलोस यांनी प्राथमिक अंदाजानुसार या बोटीमध्ये 500 प्रवासी होते.
का बुडाली बोट?
बुडणाऱ्या या जहाजाला वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहितीही तटरक्षक दलाने दिली. व्यापारी जहाजांनी या जहाजामधील लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र जहाजामधील प्रवाशांची संख्या आणि रात्रीच्या अंधारामुळे यात फारसं यश आलं नाही. जहाजामधील अनेकजण आम्ही इटलीला जाण्यासाठी निघालो होतो असं सांगत असल्याचा दावा या दुसऱ्या जहाजांवरील लोकांनी केला. मंगळवारी मध्यरात्रीनंतर सुमारे पावणेदोनच्या सुमारास या बोटीचं इंजिन बंद पडलं. यामुळे बोटीवर एकच गोंधळ उडाला आणि लोक एकाबाजूला धावले. त्यामुळे बोटीचं संतुलन गेलं आणि बोट बुडू लागली. केवळ 10 ते 15 मिनिटांमध्ये 500 लोक असलेली ही बोट बुडाल्याचं सांगितलं जात आहे.
104 लोकांना वाचवण्यात यश
यूनानने दिलेल्या माहितीनुसार ही बोट जवळच्या समुद्रकिनाऱ्यापासून 75 किमी दूर आंतरराष्ट्रीय सागरी हद्दीमध्ये बुडाली. यामधील 104 लोकांना वाचवण्यात यश आलं आहे. वाचवण्यात आलेल्या 25 जणांना हायपोथर्मियाची तक्रार केली आहे. प्रचंड ताप आल्याने या सर्वांना खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
नायजेरियामध्येही अपघात
मंगळवारी नायजेरियामध्ये लग्नातून परतणारी बोट पलटी झाल्याने 103 लोक ठार झाले आहेत. यामध्ये अनेक लहान मुलांचाही समावेश असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. बोटीत प्रमाणापेक्षा जास्त लोक असल्याने ती अक्षरश: दोन भागात दुभागली गेली होती. जवळपास 300 लोक बोटीत होते अशी माहिती आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे.