मुंबईच्या वांद्रे-वरळी सी-लिंकवर एका व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्याने समुद्रात उडी मारली असून हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सर्च ऑपरेशन केलं जात आहे. मुंबई पोलीस, नौदल आणि कोस्ट गार्ड एकत्रितपणे त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही व्यक्ती कारने वांद्रे-वरळी सी-लिंकवरुन जात होती. सी–लिंकच्या मधोमध पोहोचल्यानंतर त्याने कार थांबवली आणि थेट समुद्रात उडी मारली.
वांद्रे-वरळी सी लिंकवरुन एका व्यक्तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती मिळताच कोस्ट गार्ड यांच्यासह मुंबई पोलीस आणि नौदलाने सर्च ऑपरेशन सुरु केलं. सर्च ऑपरेशनसाठी हेलिकॉप्टरचाही वापर केला जात आहे.
वांद्रे-वरळी सी लिंकवरुन याआधीही अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न झाला आहे. याप्रकरणी मुंबई हायकोर्टात याचिकाही दाखल करण्यात आली होती. यानंतर कोर्टाने सरकारकडून उत्तर मागितलं होतं. ज्यानंतर सी-लिंकवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवत सुरक्षेत वाढ करण्यात आली होती.
याआधी 45 वर्षीय विक्रम वासुदेव यांनी वांद्रे-वरळी सी लिंकवरुन आत्महत्या केली होती. आपल्या मुलाच्या मृत्यूमुळे ते मानसिक तणावात होते. अशाच प्रकारे एका संध्याकाळी 7 वाजता हाजी अली येथून एका व्यक्तीने लिलावती हॉस्टिपलला जायचं आहे सांगत टॅक्सी बूक केली होती. त्याने टॅक्सीवाल्याला हाजीअलीच्या दिशेने जाण्यास सांगितलं. दरम्यान टॅक्सी वांद्रे-वरळी सी लिंकवर पोहोचल्यानंतर तो लघुशंकेचा बहाणा करत टॅक्सी थांबवण्याचा प्रयत्न करु लागला. यानंतर अखेर टॅक्सी चालकाने गाडी थांबवली.
यानंतर त्याने इकडे तिकडे पाहिलं आणि समुद्रात उडी मारली. यादरम्यान कंट्रोल रुममध्ये बसलेल्या अधिकाऱ्यांना एक टॅक्सी ब्रीजवर थांबल्याचं दिसल्यानंतर तात्काळ तिथे पोहोचले होते. तिथे पोहोचताच त्यांना नेमकं काय घडलं आहे याची माहिती मिळाली. त्यांनी तात्काळ पोलीस आणि अग्निशमन दलाला फोन करत घटनेची माहिती दिली. काही वेळाने त्या व्यक्तीला समुद्रातून बाहेर काढण्यात आलं. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.