पालघर..खासदार राजेंद्र गावित यांच्या तक्रारीनंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रशासनाला आदेश
हायवेवरील खड्ड्यांच्या व इतर समस्यांकडेही वेधले गडकरी यांचे लक्ष
दिल्ली / प्रतिनिधी
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील नवीन वर्सोवा पुलाच्या उद्घाटनाला अवघे तीन- चार महिने पूर्ण झाले असतानाच, पुलावर पहिल्याच पावसात ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या पुलाचे काम निकृष्ट झाल्याच्या तक्रारी असून या मुद्यावर पालघर लोकसभेचे स्थानिक खासदार राजेंद्र गावित यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीत भेट घेतली. त्यावर ‘कामाच्या गुणवत्ता बद्दल जराही तडजोड केली जाणार नाही असे सांगत तात्काळ नितीन गडकरी यांनी सबंधित पुलाचे काम करणाऱ्या ठेकेदाराला काळया यादीत टाकण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच हायवे वरील इतर समस्यांकडे ही मंत्र्यांचे लक्ष खासदार गावित यांच्याकडून वेधण्यात आले.
नव्या वर्सोवा पुलावर ठिकठिकाणी खड्डे पडून जवळपास ६८ ठिकाणी पुलावर सळया बाहेर आल्या आहेत. परिणामी वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. खड्डे पडल्याने तासन तास वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे पुलाच्या कामाच्या गुणवत्तेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. याबाबत नवीन पुल असताना खड्डे कसे पडले असा प्रश्न लोक विचारत आहेत.
अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर या पुलाचे काम पूर्ण झाले असून पुलाची मिरा भाईंदर व ठाण्याहून वसईकडे जाणारी एक मार्गिका याचं वर्षी मार्च महिन्यात खुली करण्यात आली.
याला तीन महिने पूर्ण होत असतानाच, पुलावर अनेक ठिकाणी पावसामुळे खड्डे पडले आहेत. परिणामी, मुंबईहून वसईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे दुचाकीसारख्या वाहनांचा अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या कामाची आपण चौकशी करुन योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी खासदार राजेंद्र गावित यांनी मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे भेटून केली. नवी दिल्लीत नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांना खासदार गावित यांनी निवेदन दिले व कारवाई करण्याची मागणी केली.
नितीन गडकरी यांचे तात्काळ प्रशासनाला आदेश
खासदार राजेंद्र गावित यांनी, हायवेवर नव्या पुलावर खड्डे पडल्याचे सांगताच तात्काळ नितीन गडकरी यांनी संबधित अधिकाऱ्यांना फोन करून जाब विचारला. गडकरी यांनी याबाबत अधिकाऱ्यांकडे नाराजीही व्यक्त केली.
‘याप्रकरणी निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर कडक कारवाई करा.
त्याला काळया यादीत टाका. अशा ठेकेदाराला पुढचे टेंडर घेऊ देऊ नका. विकास कामे होत असताना त्यात क्वालिटी बाबतीत अजिबात तडजोड नको’ असे गडकरी यांनी संबधित अधिकाऱ्यांना सांगितले व कारवाईचे आदेश दिले.
विकासकामे होत असताना मी स्वतः विकासकामांचा दर्जा चांगला ठेवण्याबाबत प्रयत्न करतो व आग्रही असतो,आग्रही आहे, त्यामुळे अधिकाऱ्यांनीही लक्ष ठेवणे आवश्यक आहे असेही गडकरी म्हणाले. त्याचबरोबर वसई विरार पालघर जिल्ह्यातील विकासकामे करण्यासाठी पूर्ण सहकार्य करणार असा शब्दही नितीन गडकरी यांनी खासदार गावित यांना दिला.
मुंबई अहमदाबाद हायवेवर रुग्ण वाहिका, क्रेन, अग्नि शमन वाहन , एक फिरता दवाखाना, हायवे जवळ ट्रॉमा केअर सेंटर अशा सर्व सुविधा असणे आवश्यक आहे याकडेही खासदारांनी लक्ष वेधले.
फोटो कॅपशन
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करताना खासदार राजेंद्र गावित.