देशातील च नव्हे तर जगातील पहिले मंत्रालय हे आपल्याकडे सुरू झाले असल्याचा अभिमान असून दिव्यांगांच्या भेटीगाठी मधून, परीचयामधून या देशाला आदर्श ठरेल असे दिव्यांग मंत्रालयाचे धोरण निर्माण करायचे आहे.त्यासाठी दिव्यांगाना आता जोमाने उभे राहून दमदार पाऊल टाकायचे आहे,असे प्रतिपादन मंत्री अध्यक्ष व मुख्य मार्गदर्शक दिव्यांग कल्याण विभाग ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी केले आहे.
“दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी” या अभियान अंतर्गत दिव्यांग मेळाव्याचे आयोजन गुरूवार दि.31/08/2023 रोजी नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर येथे सकाळी 10 ते 4 या वेळेत जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग आणि जिल्हा प्रशासन मार्फत आयोजित करण्यात आले होते.
दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियान राज्यस्तरीय समितीचे अध्यक्ष तथा मुख्य मार्गदर्शक म्हणून मा. ओमप्रकाश उर्फ़ बच्चू कडू (मंत्री दर्जा) विधानसभा सदस्य यांच्या अध्यक्षतेखाली आणि मार्गदर्शनाखाली हे शिबिर आयोजित करण्यात आले होते,त्यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना, सर्व अधिकारी आणि तलाठी यांची दिव्यांगांसाठी एक कार्यशाळा घेण्याची सूचना यावेळी मंत्री बच्चू कडू यांनी प्रशासनाला केली तसेच एक दिवस हा फक्त दिव्यांगांसाठी राखून ठेवण्याचे ही त्यांनी सुचित केले. तसेच बचत गटांच्या माध्यमातून देखील दिव्यांगांची प्रगती साधता येऊ शकते, प्रशासनाने योग्य नियोजन केले तर यु डी आयडी कार्ड सर्व दिव्यांगांना मिळतील, असे सांगून प्रशासनाने इतक्या मोठ्या प्रमाणावर दिव्यांग मेळाव्याचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी प्रशासनाचे कौतुक केले.
प्रकाश निकम, अध्यक्ष, जि.प. पालघर, खासदार राजेंद्र गावित, आमदार श्रीनिवास वनगा, मनिषा निमकर, समाजकल्याण समिती सभापती, रोहिणी शेलार महिला बालकल्याण समिती सभापती, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, मुख्य कार्यकारी अधकारी भानुदास पालवे,v वसई विरार महानगरपालिका अपर आयुक्त, अति.मु.का. अ.रवींद्र शिंदे,जिल्हा परिषद सदस्य कृष्णा माळी,मंगेश भोईर यांच्या प्रमुख उपस्थितीत हे शिबिर संपन्न झाले.
या शिबिरास जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर दिव्यांग बांधव उपस्थित राहिले होते.
जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले.
शिबिरा मधे विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी दिव्यांगांचे अर्ज भरून घेण्यात येणार आले. विविध दाखल्यांची नोंदणी तसेच यूडीआयडी कार्ड, आधार कार्ड, रेशन कार्ड, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचे दाखले, अधिवास प्रमाणपत्र, यासह अन्य प्रमाणपत्र तसेच विविध शासकीय महामंडळे, व शासकीय विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचे अर्ज यावेळी भरून घेण्यात आले. स्वतः बच्चू कडू यांनी हे अर्ज भरून घेतले आणि प्रत्येक दिव्यांग बांधवाला त्याच्या जागेवर जाऊन भेटून त्याच्याशी संवाद साधला, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी जिल्हा स्थापन झाल्यापासून जिल्हा परिषदेला समाज कल्याण अधिकारी हे पद रिक्त असल्यामुळे काम करण्यास अनेक प्रश्न निर्माण होतात, तरी जिल्ह्याला समाज कल्याण अधिकारी मिळावेत अशी मागणी त्यांनी मंत्री बच्चू कडू यांच्यापुढे केली. तसेच मेळावा आयोजित केल्याबद्दल समाज कल्याण विभागाचे कौतुक केले.
समाज कल्याण समिती सभापती मनीषा निमकर यांनी UDID कार्ड मिळण्यामध्ये अडथळे येत असून दिव्यांगांसाठी उत्पन्नाच्या दाखल्याची अट शिथिल करण्यात यावी असे मत व्यक्त केले.
या शिबिरात जिल्हाधिकारी कार्यालय महसुल विभाग, पालघर, पालघर जिल्हा परिषद , वसई-विरार महानगर पालिका, नगर पालिका, कृषी समाजकल्याण विभाग, पशुसंवर्धन विभाग, जिल्हा शल्य चिकित्सक,आरोग्य विभाग,दिव्यांग पुनर्वसन केंद्र, महामंडळे, बॅंक यांचासह अन्य शासकीय कार्यालयाचे 33 स्टॉल मांडण्यात आले होते, त्या माध्यमातून दिव्यांगांसाठी असणाऱ्या योजनांची माहिती देण्यात आली.
यावेळी समाज कल्याण विभागामार्फत उपस्थित लाभार्थ्यांना ग्रामपंचायत स्तरावरील पाच टक्के दिव्यांग निधी, घरकुल मंजुरी प्रमाणपत्र, UDID कार्ड वाटप, बसचे पासेस श्रवणयंत्रांचे वाटप, प्रातिनिधिक स्वरूपात करण्यात आले.
शिबिराला येण्याकरिता दिव्यांग बांधवांकरिता वसई विरार मनपाकडून सिटीबसची मोफत व्यवस्था करण्यात आली होती.
सदर मेळावा यशस्वी होण्यासाठी जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रवीण भावसार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व समाज कल्याण आणि महिला बालकल्याण विभागाने आपले योगदान दिले.