जालना जिल्ह्यातील अंतवरली सराटी गावामध्ये पोलीस आणि आंदोलकांमध्ये रेटारेटी झाली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू होते. त्या ठिकाणी पोलिसांनी लाठीचार्ज केला. उपोषण करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. आक्रमक झालेल्या आंदोलकांना आवरण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. या घटनेचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे. उपोषण आंदोलन चिरडण्यासाठी पोलिसांनी केलेल्या कारवाईविरोधात राज्यभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
29 ऑगस्टपासून मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरांगे यांच्यासह 10 जण आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाला बसले आहेत. त्यांच्या समर्थनासाठी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. उपोषण आंदोलन चिघळू नये यासाठी पोलिसांकडून उपोषण करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याला आंदोलकांनी विरोध केला. त्यानंतर दोन्ही बाजूने रेटारेटी झाली. पोलिसांनी लाठीचार्ज करण्यात आला. तर, आंदोलकांकडून दगडफेक करण्यात आल्याची माहिती आहे. आक्रमक झालेल्या आंदोलकांना आवरण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला आणि लाठीचार्ज केला.