पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वात पालघर पोलिसांनी चांगली प्रगती केली आहे, तसेच तीन वर्षांपूर्वीच्या जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात आणि आताच्या पोलीस ठाण्यात खूप बदल झाले असून पालघर जिल्ह्यातील पोलीस ठाण्याच्या आयएसओ प्राप्त मानांकन सर्टिफिकेट मिळाले आहे, हे पालघर पोलिसांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. असे मनोगत महाराष्ट्र राज्याचे अपर पोलीस महासंचालक प्रवीण साळुंके यांनी पालघर येथे व्यक्त केली. ते पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनाच्या सभागृहात पालघर पोलिसांच्या जनसंवाद अभियान अंतर्गत जिल्ह्यातील पोलीस ठाण्याला आयएसओ प्राप्त मानांकन सर्टिफिकेट वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.
पालघर येथे पालघर पोलिसांच्या जनसंवाद अभियान अंतर्गत आयोजित कार्यक्रमात ते म्हणाले की गडचिंचलेत जेव्हा साधू हत्याकांड झाला तेव्हा मी पुणे सीआयडी मध्ये होतो, तेव्हा हा केस माझ्या कडे आला होता, त्यावेळी या गुन्ह्यातील जवळपास शंभर आरोपींना कोविडमूळे ठाण्याला किंवा तळोजा कारागृहात नेणं शक्य नव्हतं, तेव्हा कोर्टाने आदेश दिले की त्यांना पोलीस ठाण्यातच ठेवा, परंतु त्यावेळेस जिल्ह्यातील पोलीस ठाण्याची परिस्थिती त्यांना ठेवणे योग्य नव्हती, पण आता तीन वर्षात जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटीलांचा नेतृत्वात जिल्ह्यातील पोलीस ठाण्याला आयएसओ आणि स्मार्ट पोलीस ठाण्याचे नामांकन प्राप्त झाले आहे.
यावेळी त्यांनी पालघर जिल्ह्यातील पोलीस ठाण्याला आयएसओ प्राप्त नामांकन सर्टिफिकेट मिळवून देणाऱ्या उद्योजक समीर रूपलक व त्यांची पत्नी सेजल समीर रुपलक यांचे अभिनंदन केले. यादरम्यान पालघर जिल्ह्यातील पोलीस पाटलांना व पोलीस मित्रांना त्यांच्या हस्ते टीशर्ट, शिट्टी व टोपी वाटण्यात आले, यावेळी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक पंकज शिरसाठ व जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी, पोलीस पाटील व पोलीस मित्र मोठी संख्येने उपस्थित होते.