मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पाच दिवसांनंतर उपोषणा मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मनोज जरांगे पाटलांवर रात्री उपचार करण्यात आले. सहकाऱ्यांच्या आग्रहानंतर जरांगे यांना सलाईन लावण्यात आलं. रात्री सलाईन लावण्यात आल्यानंतर सकाळी पुन्हा सलाईन काढण्यात आलं. मात्र सलाईन लावल्याचं आपल्या लक्षात आलं नाही. आता सलाईन लावल्यानंतर उपोषण करण्यात काय अर्थ आहे? असं म्हणत आपण उपोषण मागे घेत असल्याचं जरांगेंनी जाहीर केलं.
रात्री माझे हात-पाय दाबून मला…
“माझी तब्बेत चांगली म्हणावी लागेल. काल डॉक्टरांनी सलाईन लावलं हे माझ्या लक्षात आलं नाही. लोकांनी रात्री माझे हात-पाय दाबून मला सलाईन लावलं. लोक मला म्हणाले, तुम्हीही हवे आहातं. आरक्षण देखील हवं आहे. लोकांची माया आहे माझ्यावर! उपोषण हे माझं हत्यार आहे. त्याचा मला उपयोग करू द्या, असं मी म्हणालो पण त्यांनी ऐकलं नाही,” असं जरांगे पत्रकार परिषदेत म्हणाले. “हे सलाईन म्हणजे जेवण केल्यासारखे आहे. त्यापेक्षा नाही उपोषण केलं तरी चालतं मी या मताचा मी आहे. हे सलाईन लावत राहणार आहे. त्यापेक्षा मी मग दुपारी उपोषण स्थगित करून दौरे सुरू करीन. महिलांच्या हाताने उपोषण स्थगित करीन असं उपोषण करून काहीही फायदा नाही,” असंही जरांगे म्हणाले. “उपोषण स्थगित करून दुसऱ्या कामाला लागण्याचा माझा विचार आहे,” असं जरांगेंनी सांगितलं.
उपोषण सोडल्यानंतर काय करणार?
“सलाईन लावून येथे पडून राहण्यात काही अर्थ नाही. सरकारचा जीव ज्या खुर्चीत आहे ती खुर्ची मिळवण्याच्या तयारीत आम्ही लागू. आज दुपारी 12 वाजण्याआधी आत समाजाच्या आग्रहाखातर उपोषण सोडणार आहे. मला बिगर सलाईनच उपोषण हवं आहे. तसं उपोषण करता आलं तरच उपोषण करीन,” असं जरांगे म्हणाले.
रात्रीचा घटनाक्रम सांगितला
सरकारने पाठवलेल्या संदेशासंदर्भात विचारण्यात आलं असता जरांगेंनी, “त्यात मी पडत नही. मी जातवाण आणि ओरोजीनल आहे. मला त्यांच्या संपर्काची गरज नाही. मी न मिळणारा न्याय हिसकावून आणतो. मंत्री का आले नाही कारण एकालाही इकडे यायला तोंड नाही,” अशी टीका केली. तसेच पुढे बोलताना, “समाजाने सलाईन न लावता उपोषण करू दिलं असतं मग सरकारला माझा कचका दिसला असता. मला बळजबरीने सलाईन लावायला नको हवं होतं,” असंही जरांगे म्हणाले. “माझा समाज जोरात रडायला लागला. मला एवढं पॅक केलं की मला हलायला देखील वेळ मिळाला नाही. सलाईन लावून आंदोलन करुन उपयोग नाही. आज मी उपोषण करून काय करू? सलाईन लावून उपोषण म्हणजे वेळकाढूपणा आहे. निवडणूक जवळ आली आणि सलाईन लावून इथे पडून राहणं म्हणजे बेगडीपणा,” असं म्हणत जरांगेंनी निवडणुकीच्या तयारीला लागणार असल्याचे संकेत दिले.
दरेकरांवर एकेरी उल्लेख करत टीका
प्रवीण दरेकरांनी केलेल्या टीकेसंदर्भात विचारलं असता जरांगेंनी, “माझं हे होऊ द्या मग त्याला सांगतो मी. मला बरं होऊ द्या मग त्याला सांगतो त्यांचं कोणत्या बँकेत काय आहे हेही सांगतो. माझ्या नादाला लागू नको,” असा इशारा दिला. “तू कधीही निवडून येत नाही मागच्या दाराने आत जातो. तू शहाणा हो,” असा टोलाहीही जरांगेंनी दरेकरांना लगावला. “दरेकर यांच्यामुळे भाजपला फटका बसणार. हे 5 ते 7 जण भाजपला लागलेली कीड आहे,” अशी टीकाही जरांगेंनी केली.