Palghar Nargrik

Breaking news

बदलापूरचा ‘नराधम’ अक्षय शिंदे मोठ्या पोलीस बंदोबस्तात कोर्टात, कल्याण न्यायालयाचा मोठा निर्णय

बदलापूर येथील नामांकित शाळेत दोन चिमुरड्या विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला आज कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले. त्याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली असून त्याचा मुक्काम आता आणखी पाच दिवसांनी वाढला आहे.

आरोपी अक्षय शिंदे याला सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास मोठ्या पोलीस बंदोबस्तात कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले. त्याची पोलीस कोठडी आज २१ ऑगस्टला संपणार होती. पोलीस कोठडीत २६ ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

दरम्यान, बदलापूरमधील सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आदर्श शाळेत पोलिसांचा बंदोबस्त अजूनही तैनात आहे. बदलापूर रेल्वे स्थानकाबाहेरही पोलिसांचा बंदोबस्त आहे. शहरातील बहुतांश भागातील इंटरनेट सेवाही बंद ठेवण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

बदलापूर शहरातील एका नामांकित शाळेच्या शिशू वर्गातील दोन विद्यार्थिनींवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने अत्याचार केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ बदलापूरकरांनी मंगळवारी ‘बदलापूर बंद’ची हाक दिली होती. मात्र, सकाळी सहाच्या सुमारास हजारोच्या संख्येने जमलेल्या जनसमुदायाला शाळा प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने लोकांच्या संतापाचा उद्रेक झाला आणि त्यांनी रेल्वेरुळांवर ठिय्या मांडला.

रेल्वे स्थानकातील प्रवाशांनीही आंदोलनात उडी घेतल्याने आंदोलनाची तीव्रता वाढली. पोलिस प्रशासनाकडून समजूत घालण्याचा आणि काहीसा बळाचा वापर करण्याचा प्रयत्न केल्यानंतर या आंदोलकांनी थेट पोलिसांवर दगडफेक केल्यामुळे आंदोलनास हिंसक वळण लागले. प्रशासकीय अधिकारी, राजकीय नेते यांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करत आंदोलन सुरू राहिल्याने अखेर पोलिसांनी आक्रमक रूप धारण करून आंदोलकांवर बळाचा वापर करून दहा तासांनंतर रेल्वेमार्ग मोकळा केला.

Leave a Comment