मल्लखांब खेळात महाराष्ट्रसह देशाचे नाव उज्ज्वल करणारी व मल्लखांब या क्रिडा प्रकारातील एकमेव अर्जुन पुरस्कार विजेती कु. हिमानी उत्तम परब हिला शासकीय क्रिडा धोरणातील त्रुटीमुळे अतिउच्च गुणवत्तादार खेळाडू असूनही शासकीय सेवेत थेट नियुक्तीसाठी अडचण निर्माण होत होती. यासंदर्भात २०२३ – नागपूर हिवाळी अधिवेशनात विशेष उल्लेख सूचनेद्वारे शासकीय सेवेत थेट नियुक्तीसाठी ग्राह्य धरण्यात आलेल्या खेळांच्या यादीमध्ये ‘मल्लखांब’ या खेळाचे समावेश करण्यात यावा, अशी मागणी आमदार सुनिल शिंदे यांनी केली होती व यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरु होता.
आमदार सुनिल शिंदे यांच्या या प्रयत्नस्वरूप कु. हिमानीची आता राज्यशासनाच्या सेवेत ‘ब’ गट ‘क्रीडा अधिकारी’ म्हणून नियुक्ती झाली असून लवकरच ती या पदावर रुजू होणार आहे.या आनंदाच्या क्षणी कु. हिमानी व तिचे वडील श्री. उत्तम परब यांनी आमदार सुनिल शिंदे यांची सदिच्छा भेट घेऊन केलेल्या सहकार्यासाठी आभार व्यक्त केले. यावेळी आमदार सुनिल शिंदे यांनी कु. हिमानी हिचे अभिनंदन करून पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.