पालघर | जावेद लुलानिया
पालघर विधानसभा मतदार संघ हा महाविकास आघाडीने आणि महायुतीने शिवसेने साठी सोडला असून उबाठा सेने तुन जयेंद्र दुबळा आणि शिंदे सेनेतून सर्व पक्ष फिरून आलेले राजेंद्र गावित यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. आतील खाजगी गोष्टी कोणाच्या बाहेर काढू नये असे म्हणतात…? पण जर मतदार जनतेचा प्रश्न असेल तर आम्ही तेही बाहेर काढायला पाठी पुढे पाहणार नाही.
या बाबत बातमी पुढील प्रमाणे पालघर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या वतीनं माजी खासदार राजेंद्र गावित यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. त्यांचा शिवसेना पक्षात सोमवारी प्रवेश होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपानं हा मतदारसंघ शिवसेनेकडून ताब्यात घेतल्यानं गावित यांना थांबावं लागलं होतं. त्यावेळी भाजपानं त्यांचा पक्षप्रवेश करून घेऊन त्यांचं राजकीय पुनर्वसन करण्याचा शब्द दिला होता. मात्र, भाजपाकडून पालघर जिल्ह्यातील एकाही विधानसभा मतदारसंघातून त्यांचं पुनर्वसन होण्याची शक्यता दिसत नसल्यानं त्यांनी पुन्हा शिवसेनेत परतण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळं त्यांना पालघरमधून उमेदवारी मिळण्यावरही शिक्कामोर्तब झाला आहे.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर गावित यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली. लोकसभेत उमेदवारी मिळत नसतानाही त्यांनी बंड केलं नाही. एकनाथ शिंदे यांना विचारूनच ते भाजपात गेले. आताही भाजपात पुनर्वसन शक्य नसल्यानं त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यांशी चर्चा केलीय. महायुतीसाठी एक-एक जागा महत्त्वाची असल्यानं गावित यांच्या शिवसेना प्रवेशाला भाजपाचीही संमती आहे, अशी चर्चा आहे. सोमवारी गावित हे शिवसेनेत प्रवेश करणार असून त्याचवेळी त्यांची उमेदवारीही जाहीर होणार आहे.
पालघर विधानसभा मतदारसंघातून गेल्या वेळी शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा निवडून आले होते. शिवसेनेतील फुटीनंतर त्यांनीही एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. परंतु त्यांच्याबाबत पालघर विधानसभा मतदारसंघात नाराजी होती. शिंदे यांच्यासाठी पालघर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकणं महत्त्वाचं आहे. त्यामुळं शिंदे यांनी वनगा यांना बोलावून पुनर्वसन करण्याचा शब्द दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
गावित यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात काम केलं. काँग्रेस, शिवसेना, भाजपा आणि पुन्हा शिवसेना असा प्रवास झाला असला, तरी त्यांनी कोणत्याही वरिष्ठ नेत्याला कधीच दुखावलं नाही. त्यांचा पालघर जिल्ह्यात चांगला संपर्क असून, त्यांची हक्काची मतपेढी आहे. सागरी, नागरी आणि डोंगरी या तीनही भागात चांगली संपर्क यंत्रणा असल्यानं त्यांच्या यंत्रणेचा फायदा शिवसेनेला मिळू शकेल. त्यामुळं त्यांची घरवापसी करून त्यांना उमेदवारी देण्याचे ठरवण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
गावित यांनी त्यांच्या काळात पालघर जिल्ह्यातील विविध विकासकामं मार्गी लावली. सातत्यानं जनतेत राहणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या या प्रतिमेचा शिंदे यांनी उपयोग करून घेण्याचं ठरवलं आहे. शिवसेना शिंदे गटाकडून पक्षाच्या उमेदवारांची दुसरी यादी सोमवारी जाहीर होणार असून, पालघर विधानसभा मतदारसंघातून गावित यांना उमेदवारी दिली जाणार आहे. आता विधानसभेला तिकीट मिळणार असल्यानं गावितांचा पुन्हा शिवसेनेत प्रवेश होत आहे. विशेष म्हणजे, त्यांच्यासोबत पालघरचे माजी आमदार विलास तरे हेदेखील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे. बोईसर विधानसभेसाठी विलास तरे यांच्या नावाची चाचपणी सुरू आहे.
पालघर विधानसभा मतदार संघात बहुतेक शिवसेना शिंदे गट आणि भाजप चे इच्छुक नाराज असल्याचे बोलले जात आहे. हे नाराज कोणाला मदत करतात ते पाहणे गरजेचे आहे, त्यावरून कोण जिंकणार हे ठरवण्यात येईल. उबाठा आणि शिंदे गटात सरळ सरळ लढत असून, दोन्ही साडू भाई आमने सामने आहेत. ज्या मुळे कोणीही जिंकले तर सत्ता घरातच ही वेळ येऊ शकते.