बोईसर (प्रतिनिधी): राज्यात सत्ता स्थापन होऊन बराच काळ लोटला, पंकजा मुंडे यांनी पर्यावरणमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारली, पण आजपर्यंत एकही पालघर दौरा झाला नाही. दुसरीकडे, विराज कंपनीसारख्या उद्योगांमधून होणाऱ्या धूर आणि प्रदूषणामुळे स्थानिकांचे जीवनच धोक्यात आले आहे. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी नेमलेली मंत्रीमहोदया स्वतः एसीमध्ये राहून नागरिकांना विषारी हवेत जगायला भाग पाडत आहेत.
विराज कंपनीचा धूर – सार्वजनिक आरोग्याचा गंभीर प्रश्न
बोईसर एमआयडीसीमधील विराज कंपनीमधून दिवसेंदिवस बाहेर पडणारा घनदाट धूर परिसरातील नागरिकांच्या जिवावर बेततोय. लहान मुलं, वृद्ध, गरोदर महिला सततच्या श्वसन विकाराने हैराण झाले आहेत. संपूर्ण परिसरात धुरामुळे धुक्यासारखी अवस्था आहे. नागरिकांचा श्वास अडतोय, पण पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे मात्र शांत!
पर्यावरणमंत्रींची दौऱ्यापासून पाठ फिरवलेली नजर
पालघर जिल्हा हा औद्योगिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा असूनही, पंकजा मुंडे यांनी एकही दौरा घेतलेला नाही. ना स्थानिक जनतेच्या समस्या ऐकल्या, ना प्रदूषणाच्या वाढत्या प्रमाणावर कोणतीही ठोस भूमिका घेतली. त्यामुळे हा विभाग केवळ नावापुरता आहे की काय, असा प्रश्न जनतेत उपस्थित होतोय.
शासनाचे दुर्लक्ष – की कोणाचा हात वर?
विराज कंपनीच्या धुरामुळे सध्या संपूर्ण परिसरात अस्वस्थता आहे. हवेत केमिकलयुक्त प्रदूषण पसरल्याने नागरिकांच्या जीवनमानावर परिणाम झाला आहे. अशा स्थितीत पर्यावरण अधिकारी शांत कसे बसले आहेत, हे समजून न येण्यासारखे आहे.
प्रतिक्रिया
“मंत्री एसीमध्ये झोपतात, आम्ही धुरात श्वास घेतो!”
“राजकारणाचं तापमान कितीही असो, आमचं श्वास घेणंही कठीण झालंय. एका पर्यावरण मंत्र्याला एकदाही इथं यावंसं वाटत नाही, हे दुर्दैव नाही का?”
— जितू महामंत,नागरिक
प्रतिक्रिया
“पंकजा मुंडेंनी एक दिवस आमच्यासोबत श्वास घेऊन दाखवावा, मग कळेल या धुराचं भय!”
“शब्द नाही, कृती हवी. एक दौरा तरी करा पंकजा ताई, नाहीतर आमचं मरणही तुमच्याच खात्यावर जाईल.”
— अमोल गर्जे,सामाजिक कार्यकर्ते