भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धाच्या शक्यतेमुळे देशातील आर्थिक विश्वावर असलेली अस्थिरतेची टांगती तलवार दूर झाली आहे. भारतीय भांडवली बाजार आणि वायदे बाजारात याचे सकारात्मक पडसाद उमटताना दिसत आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात (Gold Price) सातत्याने घसरण होताना दिसत आहे. गेल्या 24 तासांमध्ये सोन्याचा दर (Gold Rates) 2365 रुपयांनी घसरला आहे. काल बाजार उघडला तेव्हा सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 96 हजार 593 रुपये होता. गेल्या 24 तासांत सोन्याचा भाव तब्बल अडीच हजाराने कमी झाला आहे. त्यामुळे आता सोन्याचा भाव प्रतितोळा 94 हजार 228 रुपये इतका झाला आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये अमेरिका-चीन व्यापार युद्ध आणि त्यापाठोपाठ भारत-पाक युद्धाच्या शक्यतेमुळे सर्वात सुरक्षित गुंतवणूक असलेल्या सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली होती. 22 एप्रिलला सोन्याचा प्रतितोळा दर 1 लाख 2 हजार 73 रुपये इतके होता. या सर्वोच्च दरावरुन सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. गेल्या काही दिवसांत सोन्याचा प्रतितोळा दरात 8 हजार रुपयांची घट झाली आहे. सध्याच्या काळ हा लग्नसराईचा असल्याने सोन्याच्या दरातील ही घसरण सामान्य वर्गाच्या पथ्थ्यावर पडणारी मानली जात आहे. आगामी काळात सोन्याचा भाव आणखी किती खालपर्यंत घसरणार, याची उत्सुकता आता सर्वांना लागू राहिली आहे.
कोणत्या कारणांमुळे सोन्याच्या भावात घट?
काही दिवसांपूर्वी अमेरिकेने जगभरातील देशांवर आयात शुल्क लादण्याची घोषणा केली होती. या निर्णयावर चीन संतापला होता. चीनच्या निषेधानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दंड थोपटले होते. त्यांनी चीनवरील आयात कर वाढवत नेला होता. चीनकडूनही अमेरिकेला त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिले जात होते. या दोन महासत्तांमुळे व्यापार युद्ध सुरु होण्याची शक्यता होती. परिणामी सोन्यातील पारंपरिक गुंतवणुकीचा कल वाढला होता. मात्र, अमेरिका आणि चीन यांनी नुकतेच 90 दिवसांसाठी नव्या करांना स्थगिती देत एक पाऊल मागे घेतले होते. त्यामुळे आता सोन्याचा भाव पडायला सुरुवात झाली आहे.
याशिवाय, अमेरिकेची मध्यवर्ती बँक असलेल्या फेडरल रिझर्व्हकडून (American Federal Bank) व्याजदर वाढवण्याच्या शक्यतेमुळे डॉलर मजबूत झाला असून, त्याचा थेट परिणाम सोन्याच्या किमतीवर झाला आहे. जागतिक बाजारात सोन्याच्या मागणीत काहीशी घट झाल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांनी नफा वसूल करण्यासाठी विक्रीचा मार्ग अवलंबला असून, त्याचा परिणाम सोन्याच्या दरांवर झाला आहे.