Palghar Nargrik

पालघर | ११ जून २०२५ — एम.आय.डी.सी. पोलिसांनी अंमली पदार्थांच्या साखळीवर मोठा घाव घालत मेफेड्रॉन (एम.डी.) चे उत्पादन, वाहतूक व विक्री करणाऱ्या टोळीतील तिघांना अटक केली असून, एकूण ₹३६,५७,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दिनांक ७ जून रोजी रात्री ११:४५ वाजता एम.आय.डी.सी. पोलिस ठाण्याच्या हद्दीत स्कोडा कार (MH 43 AN 3762) भरधाव वेगाने जाताना आढळून आली. पोलिसांनी कार अडवून चालक फरहान गुलजार खान (३६, जोगेश्वरी पूर्व) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ₹२.८० लाख किमतीचा ७१ ग्रॅम एम.डी. व ₹८ लाख किमतीची स्कोडा कार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. फरहानवर यापूर्वी मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये १३ गंभीर गुन्हे दाखल आहेत.

तपासाची महत्त्वाची ठळक वैशिष्ट्ये:

  • प्रथम अटक: फरहान गुलजार खान (मुंबई) — ७१ ग्रॅम एम.डी. (₹२.८० लाख) व स्कोडा कार (₹८ लाख) जप्त
  • दुसरी अटक: प्रतीक सुदर्शन जाधव (पालघर) — २१५ ग्रॅम एम.डी. (₹८.६० लाख) व मारुती स्विफ्ट कार (₹४.६० लाख) जप्त
  • तिसरी अटक: विजय राजाराम खटके (बोईसर) — २८० ग्रॅम एम.डी. (₹११.२० लाख), कच्चा माल व साहित्य जप्त

जप्त मुद्देमाल:

  • अंमली पदार्थ (५६६ ग्रॅम) – ₹२२.६४ लाख
  • दोन कार – ₹१२.६० लाख
  • सहा मोबाईल – ₹१.३३ लाख
  • एकूण रक्कम – ₹३६,५७,०००/-

पोलिसांनी ‘प्रोकेम फार्मास्युटिकल लॅब’, तारापूर येथे छापा टाकत एम.डी. उत्पादनासाठी वापरण्यात येणारे साहित्यही हस्तगत केले.

ही कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, सह आयुक्त सत्यनारायण, अपर आयुक्त परमजीत सिंह दहिया, पोलीस उपआयुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांच्या देखरेखीखाली पार पडली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजीव चव्हाण, निरीक्षक महेश गुरव, पो.उप.निरीक्षक महेंद्र खांगळ आणि त्यांच्या पथकाने ही कामगिरी अत्यंत शिस्तबद्धरीत्या पार पाडली.



 

Leave a Comment