Palghar Nargrik

इंस्टाग्रामवरून बेपत्ता वासुदेवचा शोध – बोईसर पोलिसांची थरारक डिजिटल मोहीम यशस्वी!

प्रतिक मयेकर 

बोईसर: दोन वर्षांपूर्वी घराबाहेर पडलेला एक मुलगा… आणि त्याच्यामागे हरवलेली अनेक स्वप्नं…वासुदेव उर्फ रोहित सिंग, वय १६ वर्ष, बोईसर परिसरातून २०२३ साली बेपत्ता झाला होता. घरातील प्रत्येकाने त्याच्या आठवणी जपल्या होत्या – फोटो, कपडे, शाळेचा आयडी कार्ड… पण मुलगा मात्र कोणाच्याही हाती लागत नव्हता. तपासात अनेक अपयशी वळणं आली, पण बोईसर पोलिसांनी हार मानली नाही. गुन्हा रजिस्टर नंबर 245/2025 BNS 137(2) अन्वये चाललेल्या या प्रकरणात शेवटी एक संकेत मिळाला – इंस्टाग्रामवर एक प्रोफाईल!

इंस्टाग्रामवरून मिळालेलं ‘जीवनदायी संकेत’ – विरारमध्ये सापडला हरवलेला मुलगा!

तांत्रिक पद्धतीने त्या अकाउंटचा मागोवा घेऊन १२ जून २०२५ रोजी वासुदेवला विरारमध्ये शोधण्यात आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि जेव्हा त्याचे वडील रामाशंकर सिंग यांच्याकडे त्याला सुपूर्त केलं, तेव्हा फक्त एक वाक्य ऐकू आलं — “हे खरंच माझं बाळ आहे ना?” आणि लगेच पित्याच्या मिठीत वासुदेव हरवून गेला… पुन्हा एकदा!

बोईसर पोलिसांनी दाखवला ‘डिजिटल युगातला मानवतेचा विजय’ या संपूर्ण प्रकरणात कोणतेही सोपं उत्तर नव्हतं.पण पोलिस निरीक्षक शिरीष पवार,तसेच त्यांची टीम सतत प्रयत्नशील होती. सोशल मीडियाचा बारीक अभ्यास, लोकेशन अॅनालिसिस, अकाउंट इंटरलिंकिंग या सर्व पातळ्यांवर काम करून त्यांनी अशक्य वाटणाऱ्या शोधाला शक्य करून दाखवलं.

पालकांच्या चेहऱ्यावर पुन्हा ‘घरटं भरल्याचा’ आनंद

दोन वर्षांपासून एकटे पडलेले आई-वडील, पुन्हा एकदा मुलाच्या नावानं देवासमोर दिवा लावू लागले आहेत. या घटनेने ‘हरवलेले लेकरू सापडू शकते’ ही समाजातील आशा अधिक बळकट केली आहे.ही फक्त पोलिस केस नव्हती — ही काळजाच्या ठोकरांवरून चाललेली भावनिक मोहीम होती!

बोईसर पोलिसांनी हे पुन्हा दाखवून दिलं आहे

कायदा केवळ दंडक नसतो, तो माणुसकी जपणारा हात असतो. ज्याला देवही विसरतो, त्याला शोधणं हे पोलिसांचं काम असतं – आणि ते त्यांनी यशस्वीरित्या केलं आहे. या तपासामध्ये पालघरचे पोलिस अधीक्षक यतिश देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक विनायक नरळे, उपविभागीय पोलिस अधिकारी विकास नाईक, आणि बोईसर पोलिस ठाण्याचे निरीक्षक शिरीष पवार यांचं कुशल मार्गदर्शन लाभलं.

पथकाची कौतुकास्पद साथ

या यशामागे पोलिस उपनिरीक्षक कमळाकर मुंढे, पोलीस नाईक रमेश पालवे,नितीन सांगळे,शुभम सपकाळे आणि इतर कर्मचाऱ्यांचं सातत्यपूर्ण मेहनतीचे योगदान आहे. त्यांच्या कार्यामुळे आज सहा कुटुंबांमध्ये पुन्हा हास्य फुलले आहे.

प्रतिक्रिया

> “बेपत्ता मुलाचा शोध ही केवळ फाईल क्लोज करण्याची गोष्ट नाही, तर ती एका घरात पुन्हा दिवा लागण्याची आशा असते. आम्हाला खात्री होती की काही ना काही डिजिटल संकेत मिळेल. अखेर इंस्टाग्रामवरील एक प्रोफाईल आमच्या संशयाच्या जाळ्यात सापडली आणि तीच त्याला परत आणण्याची गुरुकिल्ली ठरली.”

कमळाकर मुंढे,पोलिस उपनिरीक्षक

Leave a Comment