प्रतिक मयेकर
बोईसर: पालघर जिल्ह्यात वाहतूक नियमांची सर्रास पायमल्ली होत असून, संबंधित यंत्रणा केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे आणखी एक जिवघेणे उदाहरण समोर आले आहे. बोईसर औद्योगिक क्षेत्रात ‘ADHIKARI RMC’ या कंपनीचा एक ट्रक संपूर्ण वाहतूक नियम धाब्यावर बसवत प्रचंड उंचीवर बांबू लादून रस्त्यांवर धावताना पाहायला मिळाला. या ट्रकवर बांबू इतक्या असमतोल आणि बेफिकिरीने ठेवण्यात आले आहेत की, ते कोणत्याही क्षणी खाली कोसळून जीवघेणा अपघात घडवू शकतात.
ना दोरखंड, ना झेंडे – सरळ मृत्यूची सावली
उंचावरून झुकलेल्या, कोणत्याही सुरक्षिततेशिवाय ठेवलेल्या या बांबूंची अवस्था पाहता, हा ट्रक रस्त्यावरून फिरतोय की मृत्यूच्या सावलीसारखा, असा प्रश्न निर्माण होतो. ना कोणतीही चेतावणी, ना सुरक्षा दोर, ना झेंडे – फक्त बेदरकारपणा आणि कायद्याला ठेंगा दाखवणारी वृत्ती.
पोलीस आणि RTO कुठे?
सर्वात चिंतेची बाब म्हणजे, या रस्त्यावर वारंवार वाहतूक पोलीस आणि आर.टी.ओ. अधिकाऱ्यांचे गस्तीदौर असतात. मात्र अशा जिवघेण्या वाहनावर अजूनही कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. यावरून प्रशासनाची गंभीर निष्काळजीपणा, उदासीनता आणि कदाचित मौन सहमतीही दिसून येते.
अपघातानंतरच प्रशासन जागं होणार?
अशा घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षेला प्रचंड धोका निर्माण होत आहे. पादचारी, दुचाकीस्वार आणि चारचाकी वाहनचालक या ट्रकच्या आसपास येण्यासही घाबरू लागले आहेत. एखादा मोठा अपघात घडल्यानंतरच प्रशासन झोपेतून जागं होणार का? किती बळी द्यायचे रस्त्यावर?